विधान भवनातील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

विधान भवनातील लॉबीत अधिवेशनादरम्यान झालेल्या मारामारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विधान भवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेमुळे पावसाळी अधिवेशन हे अधिवेशन लक्षात राहील. रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधान भवनात घुसले. आजपर्यंत लोकशाहीच्या या पवित्र मंदिरात असा प्रकार कधी घडला नव्हता. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते विधान भवनात घडले. त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे, असे सपकाळ म्हणाले.

भाजप म्हणजे सत्तेच्या पिंडीवर बसलेला विंचू

अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱया मकोकाच्या गुंडाला भाजपचे नेतेच ‘भिऊ नकोस, मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत. आमदार निवासाच्या पॅण्टीनमध्येही एका आमदाराने असेच डब्ल्यूडब्ल्यूएफ केले. आमदारांना मवाली म्हटले जाते असे मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले, म्हणजे भाजपने जे पेरले तेच उगवले, असे सांगतानाच, भाजप म्हणजे सत्तेच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

Comments are closed.