संगमेश्वर परिसराला वन्य प्राण्यांचा विळखा, बिबटे आणि गव्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी अन् वाहनचालक धास्तावले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुका आणि आजूबाजूच्या परिसरात सध्या वन्य हिंस्त्र प्राण्यांचे मोठे संकट ओढवले असून, यामुळे स्थानिक शेतकरी, वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एरवी घनदाट जंगलात वावरणारे, नैसर्गिक अधिवासात राहून छोट्या छोट्या पशुपक्ष्यांची शिकार करून आपली उपजीविका करणारे बिबटे आणि गवे रेडे अबालवृद्धांची भीती बाजूला सारून थेट मानवी वस्तीत आणि वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर मुक्त संचार करताना दिसत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, आता केवळ रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर चक्क दिवसाढवळ्या भर उजेडातही हे प्राणी मानवी वस्तीच्या आसपास आणि रस्त्यांवर उघडपणे वावरताना दिसत आहेत. एखादे वाहन किंवा समोर माणसांना पाहूनही हे प्राणी कसलीही भीती न बाळगता भर रस्त्यात ठाण मांडून उभे राहत आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी वर्ग पहाटेपासून शेतात राबत आहे, तर दुसरीकडे रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवाशांना आता रात्रीसोबतच भर दिवसाही बिबटे आणि काळशार रंगाच्या भल्यामोठ्या गव्यांच्या कळपांचे दर्शन होत आहे. केवळ बिबटेच नव्हे, तर गव्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या भरकटण्यामुळे अनेक गंभीर प्रसंग निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी गवे रेडे थेट विहिरीत कोसळल्याच्या घटनाही घडल्या होत्या. सुदैवाने वनविभागाच्या यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले असले, तरी वेगवेगळ्या अपघातांमध्ये काही गव्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सर्व घटनांमुळे आता शेतकरी आणि वाहनचालक अशा दोन्ही घटकांवर दुहेरी संकट ओढवले आहे. शेतात कामाला जावे कसे आणि रस्त्यावरून प्रवास करावा कसा, असा यक्षप्रश्न सर्वांसमोर ठाण मांडून उभा आहे.

​अशातच, नुकताच संगमेश्वर तालुक्यातील जांभूळवाडी ते कुंभारखणी मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका मैदानात भल्यामोठ्या गव्यांचा कळप हैदोस घालताना काही जागरूक वाहनचालकांच्या दृष्टीस पडला आहे. भरवस्तीच्या इतक्या जवळ आणि तेही दिवसा उजेडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गव्यांचा वावर असल्याने परिसरातील गावांमध्ये घबराट पसरली आहे. या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन, हिंस्त्र प्राणी आणि गव्यांचा मानवी वस्तीतील वावर रोखण्यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करावी आणि या भागातील नागरिकांना भयमुक्त करावे, अशी तीव्र मागणी आता संगमेश्वर तालुक्यातून केली जात आहे.

Comments are closed.