हसिना किती दिवस राहू शकते?

परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे आश्वासन

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बांगला देशच्या पतच्युत नेत्या शेख हसीना या भारतात कितीही काळ राहू शकतात, असे आश्वासक विधान भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. भारत त्यांना यापुढेही सहकार्य करत राहणार आहे. हसीना यांना एका वेशिष्ट परिस्थितीत आपला देश सोडावा लागला आहे. भारतात वास्तव्य करण्याचा त्यांचा व्यक्तीगत निर्णय आहे. त्यामुळे त्या त्यांची इच्छा असेपर्यंत भारतात राहू शकतात, असे जयशंकर यांनी शनिवारी पत्रकारांसमोर स्पष्ट केले.

शेख हसीना यांनी सलग 15 वर्षे बांगला देशचे नेतृत्व केले होते. त्यांच्या काळात त्या देशाचे भारताशी संबंध सौहार्दाचे राहिलेले होते. मात्र, त्यांच्या विरोधात बांगला देशात हिंसक आंदोलन करण्यात आले. त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातून बाहेर पडून भारतात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या त्या भारतात सुरक्षित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत बांगला देशच्या नव्या प्रशासनाने त्यांच्या विरोधात विविध आरोपांअंतर्गत अभियोग चालविला होता. त्यांना तेथील लवादाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, शेख हसीना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

मुक्त वातावरणात निवडणूक व्हावी

बांगला देशाच्या अस्थायी प्रशासनाने त्या देशात निवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांच्या काळात निवडणुका न्यायोचित वातावरणात होत नव्हत्या असा आरोप तेथील काही राजकीय पक्षांनी केला आहे. हसीना यांनी हा आरोपही फेटाळला आहे. शेख हसीना यांच्यावर आरोप करणाऱ्या नव्या प्रशासनाने आता आपल्या कार्यकाळात न्यायोचित वातावरणात निवडणूक घेऊन दाखवावी, असा उपरोधिक टोलाही जयशंकर यांनी लगावला. बांगला देशमधील हालचालींवर भारताचे लक्ष आहे. या देशात लवकच स्थैर्य आणि शांतता निर्माण होईल, अशी भारताला आशा वाटते. त्या देशाला सहकार्य करण्यास आम्ही सज्ज आहोत. तथापि, त्या देशाचा प्रतिसादही मिळणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

Comments are closed.