‘मला नेहमीच असं वाटायचं' केन विलियमसनने ‘या' खेळाडूला सध्याच्या सर्व फॉरमॅटमधील विश्वस्तरीय खेळाडू म्हटलं!

दुनियातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या केन विलियमसनने (Kane Williamson) अशा एका खेळाडूबद्दल मत व्यक्त केलं आहे, ज्याला तो तिन्ही फॉर्मेट्समध्ये दर्जेदार खेळाडू मानतो. टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना विलियमसनने या खेळाडूबाबतचं आपलं मत मांडलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून, भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आहे. गिलला विलियमसनने सर्व फॉर्मेट्समधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवलं आहे.

गिलबद्दल बोलताना विलियमसन म्हणाला, मला नेहमीच वाटायचं की शुबमन गिल कर्णधारपदासाठी अगदी योग्य आहे. त्याचा खेळ पाहताना असं वाटतं की त्याचं वय जितकं आहे त्यापेक्षा तो खूपच परिपक्व आहे आणि तुम्ही जाणता की त्याच्यात नैसर्गिक नेतृत्वगुण आहेत. तो तिन्ही फॉर्मेट्समध्ये एक विश्वस्तरीय खेळाडू आहे.

गिलच्या कर्णधारपदावर पुढे बोलताना विलियमसन म्हणाला, त्याला ही संधी मिळणं माझ्यासाठी काही आश्चर्याचं नव्हतं. पण त्याचं कौशल्य स्पष्ट आहे. तो खरोखरच विश्वस्तरीय खेळाडू आहे. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहणं आणि ड्यूक्स बॉलसह वेळोवेळी कठीण परिस्थितींमध्ये त्याने जसं वर्चस्व गाजवलं आहे, ते खरंच आश्चर्यकारक आहे. त्याच्यासाठी अजून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि तो भविष्यात कसा कर्णधार बनतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सध्या हे सुरुवातीचे दिवस आहेत.

कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिलची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारत सध्या इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तरीही, फिरोजपूरमध्ये जन्मलेल्या गिलने फलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 6 डावांत 101.17 च्या सरासरीने 607 धावा केल्या आहेत. गिल ह्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून मॅंचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे.

Comments are closed.