…तर बुमराच्या जागी अर्शदीपला खेळवा! अजिंक्य रहाणेची शिफारस

मँचेस्टरमधील आगामी चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जर जसप्रीत बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला संघात समाविष्ट करण्याचा सल्ला ‘टीम इंडिया’चा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिला आहे.

अर्शदीपने अद्यापि कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नसले, तरी इंग्लंडमध्ये तो रेड-बॉल क्रिकेट खेळला आहे. 2023 साली काऊंटी क्रिकेटमध्ये केंट संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्शदीपने 5 सामन्यांत 13 बळी टिपले होते. दरम्यान, जसप्रीत बुमराला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याला पाचव्या कसोटीकरिता ताजेतवाने ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

रहाणेने अर्शदीप इंग्लंडमधील परिस्थितीत सहज जुळवून घेऊ शकेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला असून, ओल्ड ट्रॅफर्डवर त्याचा उपयोग होईल, असेही नमूद केले.

डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून त्याची वेगळी शैली व चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्याची क्षमता इंग्लंडमधील सीम-स्विंगला पोषक खेळपट्टीवर प्रभावी ठरेल, असे रहाणेने स्पष्ट केले.

‘माझ्या मते, होय. जर बुमरा खेळला नाही, तर अर्शदीपलाच संधी दिली पाहिजे. इंग्लंडमध्ये तुम्हाला असा डावखुरा गोलंदाज हवा असतो, जो चेंडू दोन्ही दिशांना वळवू शकेल. त्यामुळे बुमरा खेळला नाही, तर पुढच्या सामन्यात अर्शदीपच योग्य पर्याय ठरेल,’ असे रहाणेने स्पष्टपणे सांगितले.

Comments are closed.