छत्तीसगडमधील विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम, अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी, विरोधकांवर जोरदार टीका
वृत्तसंस्था / रायपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगड राज्याच्या नव्या विधानभवनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. शनिवारी या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी 14 हजार 260 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभही केला. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. आज देश अत्यंत वेगाने प्रगतीपथावर अग्रेसर आहे. आपल्या परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यांची जपणूक करताना आम्ही विकासातही मोठी मजल गाठली आहे. आपल्या ऐतिहासिक वारशाचे पालन आणि विकास अशा दोन्ही आघाड्यांवर आज आम्ही कार्य करत आहोत. केंद्र सरकारच्या धोरणांचे प्रतिबिंब या कामांमध्ये दिसून येत आहे. भविष्यकालीन भारताच्या प्रगतीची पायाभरणी आम्ही करत आहोत. छत्तीसगड विधिमंडळाची ही नवी वास्तू याच धोरणाचे प्रतीक आहे. ही वास्तू आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने निर्माण करण्यात आली आहे. तथापि, या वास्तूत छत्तीसगडच्या भव्य आणि समृद्ध ऐतिहासिक परंपरेचे दर्शनही घडते. आधुनिकता आणि वारसा यांचा हा संगम केंद्र सरकारच्या धोरणांमुळे होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ही वास्तू ‘नवा रायपूर’ या शहरात साकारण्यात आलेली आहे.
शांती शिखरचे उद्घाटन
ब्रम्हकुमारी संस्थेच्या ‘शांती शिखर’ या वास्तूचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या वास्तूत या संस्थेचे आध्यात्मिक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. आध्यात्मिक शिक्षण, ध्यानधारणा आणि इतर आध्यात्मिक कार्यांचे केंद्र येथे आहे. या कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. या देशाचा विकास प्रत्येक राज्याच्या विकासाशी जोडला गेला आहे. त्यामुळे राज्यांच्या विकासामधून देशाचा विकास करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले आहे. पुढच्या दोन दशकांमध्ये भारताला विकसीत राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त करुन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयाला भेट
नवा रायपूर येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. येथे त्यांनी अडीच हजारांहून अधिक बालकांशी ‘दिल गी बात’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत संवाद साधला. या बालकांना हृदयविकाराने ग्रासले होते. या बालकांवर या रुग्णालयात विनामूल्य आणि यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. या बालकांना त्यांच्या हस्ते जीवनदान प्रमाणपत्रे प्रदान केली गेली.
वीर नारायणसिंह स्मारकाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवा रायपूर येथे ‘हुतात्मा वीर नारायणसिंग स्मारका’चे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘वनवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालया’चेही उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 हजार 260 कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही चालना दिली. या प्रकल्पांमध्ये मार्गनिर्मिती, आरोग्य केंद्रे, महाविद्यालये, रुग्णालये आणि शिक्षणकेंद्रे यांचा समावेश आहे.
राज्यनिर्मितीला 25 वर्षे पूर्ण
छत्तीसगड राज्याच्या निर्मितीला शनिवारी 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या राज्याची निर्मिती 2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या काळात, याच सरकारच्या पुढाकाराने झाली होती. त्यापूर्वी हे राज्य मध्यप्रदेश राज्याचा एक भाग होते. वेगळ्या राज्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून केली जात होती. अखेर 2000 मध्ये ती पूर्ण होऊन हे राज्य अस्तित्वात आले.
Comments are closed.