IND vs SA Kolkata Test – जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेची हवा काढली आणि इतिहास रचला!

टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र, वेगावर स्वार होऊन अचुक माऱ्यासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कहर बरसवणारी गोलंदाजी केली आहे. टेस्ट चॅम्पियन्स म्हणून कॉलर टाईट करण्याच्या तयारीत असलेल्या दक्षिण आफ्रिकेची त्याने पहिल्याच दिवशी हवा काढून टाकली आणि अर्धा संघ तंबुत धाडला. कोलकात्याच्या ऐतिहासिक इडन गार्डन्सवर त्याच्या विकेटचा पंच पाहून चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. त्याने या धमाकेदार कामगिरीसोबत टीम इंडियाचे माजी गोलंदाज भगवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका धावांचा डोंगर उभा करणार, अशी शक्यता होती. मात्र, जसप्रीत बुमराहने सर्वांनाच धप्पा देत अर्धा संघच तंबुत धाडला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त 159 धावांवरच बाद झाला. बुमराहने 27 धावा देत पाच विकेट घेतल्या. जसप्रीतने मार्क्रम, रिकेल्टन, टोनी डी जोरजी, साइमन हार्मर आणि केशव महाराज यांना बाद केलं. जसप्रीत बुमराहने घेतललेल्या या पाच विकेट ऐतिहासिक ठरल्या आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाच विकेट घेणारा टीम इंडियाचा वेगावन गोलंदाज बनला आहे. अशी कामगिरी यापूर्वी इशांत शर्माने 2019 साली बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीमध्ये केली होती.
जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेताच टीम इंडियाचे दिग्गज माजी फिरकीपटू भगवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकूण 16 वेळा जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. भगवत चंद्रशेखर यांनी सुद्धा आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये 16 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाकडून सर्वाधिक 37 वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या नावावर आहे. त्यानंतर अनिल कुंबळे (37), हरभजन सिंह (25), कपिल देव (23) आणि आता भगवत चंद्रशेखर यांच्या जोडीला जसप्रीत बुमराहच्या नावाची नोंद झाली आहे.

Comments are closed.