विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फटकेबाजी केली; मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि धावांची लयलूट केली. तीन सामन्यांमध्ये त्याने 302 धावा चोपून काढल्या ज्यामध्ये दोन खणखणीत शतकांचा सुद्धा समावेश आहे. तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 65 धावांची विजयी खेळी केली. मालिकेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

विराट कोहली या मालिकेत मालिकावीर ठरला आणि त्याने इतिहास रचला. विराट कोहलीने आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 21 वेळा मालिकावीर होण्याचा बहुमान पटकावला आहे. या बाबतीत त्याने आता क्रिकेटचा देव म्हणजेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मागे टाकलं आहे. त्यामुळे विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर होणारा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये एकूण 20 वेळा मालिकावीर होण्याचा बहुमान पटकावला आहे. सर्वाधिक वेळा मालिकावीर होणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली (21) पहिल्या क्रमांकावर त्यानंतर सचिन तेंडुलकर (20), शाकिब अल हसन (17), जॅक कॅलिस (15), डेव्हिड वॉर्नर (13) आणि सनथ जयसूर्या (13) या खेळाडूंचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली आणि 302 धावा चोपून काढल्या. विराटने पहिल्याच सामन्यात 135 धावांची सलामी दिली आणि दुसऱ्या सामन्यात 102 धावा चोपून काढल्या. तसेच तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद 65 धावांची खेळी केली आणि सामना जिंकूण देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. त्याच्या या विस्फोटक फटकेबाजीमुळे विराट कोहली मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Comments are closed.