क्रिकेटनामा – कसोटी मालिका चुरशीची होणार!

>>संजय कऱ्हाडे

जागतिक कसोटी स्पर्धा जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन कसोटींच्या मालिकेत आजपासून कोलकात्यात आपल्याशी दोन हात करणार आहे. ही मालिका मोठी चुरशीची होणार हे नक्की!

त्यांची एकदम मस्त तयारी झालेली आहे. पाकविरुद्ध दोन कसोटींची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवून ते कोलकात्यात पोचलेत. शिवाय, हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूला त्यांच्या ‘अ’ संघाने कल्पनेतर झंडे गाडलेले आपण पाहिलंच. चौथ्या डावात थोडय़ाथोडक्या नव्हे, तब्बल 417 धावा उभारून त्यांनी जबरदस्त विजय मिळवला. हा विजय खिशात घालताना त्यांनी सिराज, प्रसिध, आकाशदीप आणि कुलदीप यांना कुटून काढलं!

जॉर्डन, हमझा, बवुमा, सेनोक्वान आणि कॉनरसारख्यांना धावा करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती साधली! अर्थात, याच सामन्यात ध्रुव जुरेलनेही छान हात धुऊन घेतले. सामन्याच्या दोन्ही डावांत त्याने आकर्षक शतकं फटकावली. साईने मात्र संधी गमावली. पहिल्या कसोटीत दोघंही खेळतील, पण तिसऱ्या क्रमांकावर साई की जुरेल अशी जुंपणार!

दक्षिण आफ्रिकेचा बाकी संघ पाकमधून आपल्यासारख्याच खेळपट्टय़ांवर सरावून आलाय.  डावरा केशव महाराज पाकिस्तानात विजयी कसोटीत आपल्या फिरकीची जादू दाखवून आलाय! ऑफस्पिनर हार्मरसुद्धा आहेच. याच सामन्यात मार्क्रम, जॉर्जी, स्टब्स आणि मुथुस्वामी ही मंडळीसुद्धा आपापली बॅट परजून आलीय. जलदगती रबाडा, यान्सन तर आहेतच शिवाय कॉर्बीन बॉशसुद्धा मुल्डरला मागे सारून केवळ वेगाच्या जोरावर संघात मुसंडी मारून आपल्या दिग्गजांना गुदगुल्या करू शकेल!

कोलकात्यात सामना अर्धा तास लवकर सुरू होतो. एकीकडे हवामान बऱ्यापैकी थंड झालंय. खेळपट्टी छान ताजी आहे. पहिल्याच दिवशी खेळपट्टीकडून नव्या चेंडूला साथ मिळू शकते, तर दुसरीकडे तिस्रया-चौथ्या डावात खेळपट्टी फिरकीला डोक्यावर बसवेल असा इशारा सौरवदादाने दिलाय. साहजिकच, पुन्हा एकदा टॉस महत्त्वपूर्ण ठरणार आहे!

तितकेच महत्त्वाचे ठरतील ते आपले गोलंदाज. बुमरा, सिराज, जाडेजा, सुंदर आणि कुलदीप असे पाच गोलंदाज आपण खेळवणं आवश्यक आहे. राहुल, यशस्वी, साई, शुभमन, पंत आणि जुरेल धावांची जबाबदारी वाहतील. तर मदतीला जडेजा अन् सुंदर!

या मालिकेला ‘फ्रीडम ट्रॉफी सीरिज’ असं नाव दिलं गेलंय. म्हणूनच आपल्या क्रिकेट बोर्डाला काही प्रश्न विचारावेसे वाटतायत. दक्षिण आफिकेचा संघ इकडे जसा छान तयारीनिशी आला, तशीच तयारी करून आपला संघ ऑस्ट्रेलियात का गेला नव्हता? ऑस्ट्रेलियात वन डे आणि टी–ट्वेण्टी मालिकांपूर्वी सराव सामने का खेळला नाही? कसोटी मालिकेआधी आपल्या मुख्य गोलंदाजांना विरुद्ध संघाच्या ‘अ’ संघासमोर आपण का उघडं पाडलं? आता त्याचे काही परिणाम आपल्याला मालिकेत भोगावे लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? की, जोपर्यंत क्रिकेट आहे, क्रिकेटप्रेमी आहेत, प्रायोजक आहेत तोपर्यंत चित भी मेरी और पट भी मेरी?

Comments are closed.