नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर कर्णधार शुबमन गिल! 19 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडण्याची संधी

इंडिया कसोटी कर्णधार शुबमन गिल रेकॉर्डः इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार शुबमन गिल आतापर्यंत जबरदस्त फॉर्मात दिसत आहे. त्याने 3 सामन्यात 600 हून अधिक धावा केल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारताचा कसोटी कर्णधार गिलला इतिहास रचण्याची संधी असेल. तो इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनू शकतो. असे करण्यासाठी त्याला मँचेस्टर कसोटीत फक्त 25 धावा आणखी कराव्या लागतील. (Shubman Gill Test record)

इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड आशियाई फलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे. त्याने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत 631 धावा केल्या होत्या. तर, गिलने इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत 3 सामन्यांच्या 6 डावांमध्ये 607 धावा केल्या आहेत. त्याला युसूफचा रेकाॅर्ड मोडण्यासाठी चौथ्या कसोटी सामन्यात 25 धावा आणखी कराव्या लागतील. या मालिकेत गिलने आतापर्यंत 1 द्विशतक आणि 2 शतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 269 धावा आहे. जर त्याने चौथ्या कसोटीत 25 धावा केल्या, तर तो मोहम्मद युसूफचा 19 वर्षांचा जुना रेकाॅर्ड मोडून काढेल. (Mohammad Yusuf Test record)

या सामन्यात शुबमन गिलला आणखी काही रेकाॅर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असेल. मँचेस्टर कसोटी सामन्यात गिलने जर 146 धावा केल्या, तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. हा रेकाॅर्ड सध्या इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्राहम गूच (यांच्या नावावर आहे. त्यांनी 1990 मध्ये एका मालिकेत 752 धावा केल्या होत्या. (Shubman Gill Manchester Test)

गिल यासह इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही (Most Runs by an Indian batsman against England in a Test Series) बनू शकतो. त्याच्याकडे यशस्वी जयस्वालला मागे टाकण्याची संधी आहे. 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जयस्वालने 712 धावा केल्या होत्या. गिलला जयस्वालच्या पुढे जाण्यासाठी 106 धावा आणखी कराव्या लागतील. आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात गिल किती रेकाॅर्ड आपल्या नावावर करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (Most runs against England Test)

Comments are closed.