अडीच दिवसांतच अफगाणिस्तानची फिरकी, सुथारनंतर सुंदर-कुलदीपसमोर दुसरा डावही आटोपला; हिंदुस्थानचा डाव आणि 300 धावांचा महाविजय

अफगाणिस्तानच्या फलंदाजांसाठी ही एकमेव कसोटी फिरकीच्या वाळवंटातील भयानक वादळ ठरली. पदार्पणवीर मानव सुथारने पहिल्या डावात आपल्या धारदार फिरकीने अफगाण फलंदाजीचा कणा मोडला आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांनी दुसऱ्या डावात उरलीसुरली आशाही गिळंकृत केली. हिंदुस्थानी फिरकीच्या त्रिशुळापुढे अफगाणी फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. त्यामुळे एकमेव कसोटी जिंकण्यासाठी हिंदुस्थानला तीन दिवसांचीही प्रतीक्षा करावी लागली नाही. अवघ्या अडीच दिवसांत अफगाणिस्तानचा फडशा पाडत हिंदुस्थानने एक डाव आणि तब्बल 300 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा हिंदुस्थानचा कसोटी क्रिकेटमधील डावाने विजयाचा सर्वात मोठा विजय ठरला.

मानवचा वार आरपार

रहमत शाहने 135 चेंडूंत 60 धावांची जिद्दी खेळी करत काही काळ प्रतिकार केला; मात्र मानव सुथारने त्याला आपल्या फिरकीच्या मोहजालात अडकवले. पायाभोवती फिरणाऱ्या चेंडूने रहमतची विकेट घेतली आणि अफगाणिस्तानच्या फलंदाजीचा कणाच मोडला. त्यानंतर मोहम्मद सलीमला शून्यावर पायचीत करत सुथारने सहावा विकेट मिळवला. 33 धावांत 6 विकेट घेत त्याने हिंदुस्थानी गोलंदाजांच्या पदार्पणातील तिसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अफगाणिस्तानचा पहिला डाव केवळ 152 धावांत संपला आणि फॉलोऑन अटळ ठरला.

फॉलोऑननंतरही तीच कथा

फॉलोऑननंतर अफगाणिस्तानकडून प्रतिकाराची अपेक्षा होती. सदीकुल्लाह अटलने 42 धावांची खेळी करत काही आक्रमक फटके खेचले. मात्र, ती ठिणगी मोठ्या आगीत बदलण्याआधीच हिंदुस्थानी फिरकी त्रिकुटाने ती विझवली.

वॉशिंग्टन सुंदरने मोठे वळण न देता हवेतल्या ड्रिफ्टचा असा सुरेख वापर केला की, अफगाण फलंदाज अक्षरशः दिशाहीन झाले. त्याने 36 धावांत 4 विकेट घेतले. दुसऱ्या टोकाला कुलदीप यादवने आपल्या गुगली आणि चायनामनने 30 धावांत 3 विकेट घेत अफगाणिस्तानचा खेळ 35.5 षटकांतच संपवला. रहमानुल्ला गुरबाझ, रहमत शाह आणि कर्णधार हश्मतुल्ला शाहिदी परतताच अफगाणिस्तानच्या ड्रेसिंगरूममध्ये निराशेची छाया पसरली. अटल बाद झाल्यानंतर तर लढाई संपल्याचे स्पष्ट झाले.

चहापानानंतर विक्रमावर शिक्कामोर्तब

चहापानानंतर खालच्या फळीने मोठे फटके मारून काही काळ सामना वाढवण्याचा प्रयत्न केला; पण तो प्रयत्न बुडणाऱ्याने काडी पकडण्यासारखाच ठरला. अखेरीस मोहम्मद सलीमचा झेल साई सुदर्शनने टिपला आणि अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112 धावांत संपुष्टात आला. त्याच क्षणी हिंदुस्थानच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब झाले. अडीच दिवस चाललेल्या या सामन्यात अफगाणिस्तानला ना फलंदाजीत उभे राहता आले, ना गोलंदाजीत आव्हान देता आले. मैदानावर एकच सूर घुमत होता, हिंदुस्थानचा दबदबा आणि मानव सुथारचा उदय.

पदार्पणातच ‘मानव’ ठरला विक्रमवीर

कसोटी पदार्पणातच इतिहासाच्या पानांवर नाव कोरण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. मानव सुथारने ते साध्य केले. सहा विकेटची जादुई कामगिरी, सामन्यावर निर्विवाद पकड आणि प्रतिस्पर्ध्याच्या मनात निर्माण केलेली भीती… या सर्व गोष्टींमुळे तो या कसोटीचा खरा शिल्पकार ठरला. न्यू चंदीगडमध्ये हिंदुस्थानने केवळ सामना जिंकला नाही, तर अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेटच्या कठोर वास्तवाची झणझणीत जाणीव करून दिली.

Comments are closed.