लवकरच अंमलात येण्याचा भारत-एएफटीए करार

पियुष गोयल यांचे प्रतिपादन, भारतात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता केली व्यक्त

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि युरोपातील चार देशांचा गट ईएफटीए यांच्यातील व्यापार करार येत्या 1 ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार आहे, अशी महत्वपूर्ण माहिती भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या दोन्ही बाजेमध्ये 10 मार्च, 2024 या दिवशी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या कराराच्या अंतर्गत भारतात येत्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची (साधारणत: साडेआठ लागम कोटी रुपये) गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतासाठी हा करार मोठ्या प्रमाणात लाभदायक सिद्ध होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.

हा करार ‘व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार’ (टीईपीए) या नावाने ओळखला जात आहे. ईएफटीए गटात आईसलंड, लिचेटेनस्टेन, नॉर्वे आणि स्विट्झरर्लंड हे चार देश समविष्ट आहेत. हा करार भारत आणि हा गट यांना लाभदायक ठरेल अशा प्रकारे करण्यात आला आहे. त्याच्या अंतर्गत अनेक उत्पादनांवर शून्य आयात कर लावण्याची तरतूद असून त्यामुळे भारतातील अनेक व्यवसायांची वाढ होऊ शकते. कच्चे आणि पैलू पाडलेले हीरे, जगप्रसिद्ध स्विस घड्याळे, चॉकलेटस् आदी उत्पादनांचा शून्य कर सूचीत समावेश आहे.

10 वर्षांमध्ये 50 अब्ज

भारतामध्ये या कराराच्या अंतर्गत होऊ शकणाऱ्या 100 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीपैकी 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक कराराचे कार्यान्वयन झाल्याच्या दिवसापासून 10 वर्षांमध्ये केली जाणार आहे. उरलेल्या 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पुढच्या पाच वर्षांमध्ये केली जाणार आहे. या गुंतवणुकीसमवेतच भारताला या देशांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानही हस्तांतरित केले जाऊ शकते, अशी माहिती शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

अशा प्रकारचा करार प्रथमच

व्यापार कराराच्या अंतर्गत मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन असणारा हा करार भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासातील प्रथमच करार आहे. भारतात यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठे प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. उच्च गुणवत्तेच्या आणि निर्यातक्षम उत्पादनांचे भारतातील प्रमाण या करारामुळे वाढणार आहे.

रोजगारक्षम करार

या करारामुळे भारतात किमान 10 लाख थेट रोजगार निर्माण होणार आहेत. भारतात केली जाणार असलेली गुंतवणूक हा या कराराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे चार देश आकाराने छोटे असले, तरी ते तंत्रज्ञान आणि संपत्ती या दृष्टींनी बरेच मोठे आहेत. त्यामुळे ते एकत्रितरित्या अशी गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत. या देशांचा जगाशी असणारा व्यापार मोठा आहे. आता भारतालाही तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याने भारतासाठी हा करार एक आर्थिक टॉनिक ठरेल, असा विश्वास अनेक अर्थविषयक तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंना यामुळे या देशांची बाजारपेठ मिळणार आहे. परिणामी भारताचा निर्यात व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढणे शक्य आहे.

सेवाक्षेत्राला लाभदायक

भारतात सेवाक्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सेवाक्षेत्राला उपयुक्त ठरणाऱ्या पायाभूत सुविधाही भारतात चांगल्या प्रमाणात विकसीत झाल्या आहेत. भारत या गटातील चार देशांना आपल्या विकसीत सेवाक्षेत्राला लाभ देऊ शकतो. उत्पादित वस्तूंप्रमाणे सेवांची निर्यातही भारत करु शकणार आहे. भारताने आपल्या 82.7 टक्के टॅरीफ लाईन्स या देशांना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे या चार देशांच्या आयातीतील मोठा भाग भारत पुरवू शकतो. या देशांमध्ये निर्माण होणारी उच्च दर्जाची उत्पादने भारतीयांनाही विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

करार उभयपक्षी लाभदायक

ड भारत आणि ईएफटीए व्यापार आणि गुंतवणूक करार उभयपक्षी लाभाचा

ड भारताच्या सेवा क्षेत्राला मोठे प्रोत्साहन या करारामुळे मिळण्याची शक्यता

ड भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि तंत्रज्ञान हस्तांतरण हेणे शक्य

ड चार देशांमध्ये निर्माण होणारी उच्च उत्पादने भारतातही होणार उपलब्ध

 

 

Comments are closed.