टीम इंडियाचं स्वप्न अधुरंच… पण भारतीय वंशाचे 4 शिलेदार यंदा FIFA World Cup गाजवणार; कोण कोणत्
फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) मध्ये भारतीय फुटबॉल संघाला खेळताना पाहणे हे जरी सध्या एक स्वप्न असले, तरी या महाकुंभात भारतीय वंशाचे खेळाडू नक्कीच खेळताना दिसणार आहेत. 11 जून 2026 पासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्या संयुक्त यजमानपदाखाली या स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जगातील विविध बलाढ्य देशांकडून भारतीय वंशाचे 4 प्रतिभावान खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
सरप्रीत सिंग – न्यूझीलंड (Sarpreet Singh)
27 वर्षीय सरप्रीत सिंग हा न्यूझीलंडचा आक्रमक मिडफिल्डर (Attacking Midfielder) आहे. त्याचे कुटुंब मूळचे पंजाबमधील जालंधर येथील असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा जन्म आणि संगोपन न्यूझीलंडमध्येच झाले. सरप्रीत गेल्या आठ वर्षांपासून न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघासाठी खेळत आहे. त्याने युरोपियन फुटबॉलमध्येही आपली छाप सोडली असून जगप्रसिद्ध FC Bayern Munich या क्लबशी त्याचा संबंध राहिला आहे. बायर्न म्युनिकसारख्या दिग्गज क्लबकडून खेळण्याचा मान मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय वंशाच्या फुटबॉलपटूंमध्ये त्याची गणना होते. त्याच्या उत्कृष्ट बॉल कंट्रोल, पासिंग आणि आक्रमक शैलीमुळे तो न्यूझीलंडच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.
तहसीन मोहम्मद जमशीद – कतार (तहसीन मोहम्मद जमशीद)
20 वर्षीय तहसीन तहसीन मोहम्मद जमशीद हा कतारच्या फुटबॉलमधील उदयोन्मुख तारा मानला जातो. त्याचे आई-वडील मूळचे केरळमधील आहेत. त्यामुळे त्याचे भारतीय मूळ विशेष चर्चेत असते. यंदाच्या विश्वचषकात तो कतारच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. कतार स्टार्स लीगमध्ये खेळणारा भारतीय वंशाचा पहिला खेळाडू म्हणूनही त्याची ओळख निर्माण झाली आहे. विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर त्याचे अनेक स्तरांवर कौतुक झाले होते. भारतातील काही राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही त्याचे अभिनंदन केले होते.
निशान वेलुपिल्लई – ऑस्ट्रेलिया (निशान वेलुपिल्लई)
ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा निशान वेलुपिल्लई हा भारतीय वंशाचा आणखी एक प्रतिभावान फुटबॉलपटू आहे. विंगर आणि स्ट्रायकर या दोन्ही भूमिकांमध्ये तो प्रभावी खेळ करतो. ऑस्ट्रेलियासाठी खेळताना त्याने आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 3 गोल केले आहेत. त्याचे वडील शशिनाथ वेलुपिल्लै हे मलेशियातील असून त्यांचे श्रीलंकन-तमिळ मूळ आहे. तर त्याची आई गिलियन वेलुपिल्लै या अँग्लो-इंडियन वंशाच्या आहेत. वेगवान धावा, चपळ हालचाली आणि गोलसमोरील अचूक फिनिशिंग ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्त्वाचा आक्रमक खेळाडू बनला आहे.
सॅम्युअल मौटौसामी – काँगो
डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणारा सॅम्युएल मुथुसामी हा यंदाच्या विश्वचषकात कॉंगोचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचा जन्म फ्रान्समध्ये झाला असला तरी त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बहुसांस्कृतिक आहे. त्याची आई कॉंगोची असून वडील तमिळ वंशाचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याचे भारतीय मूळ अधोरेखित होते. सॅम्युएलने कॉंगोसाठी आतापर्यंत 57 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मध्यफळीत संघाचा तोल सांभाळणे, चेंडू हिसकावून घेणे आणि बचावफळीला बळकटी देणे यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या अनुभवाचा फायदा कॉंगोला विश्वचषकात नक्कीच होईल.
फिफा विश्वचषक 2026 मध्ये भारताचा संघ नसला तरी भारतीय वंशाशी नाते सांगणारे हे चार खेळाडू जगाच्या सर्वात मोठ्या फुटबॉल मंचावर चमकताना दिसतील. पंजाब, केरळ आणि तमिळ मूळ असलेल्या या खेळाडूंनी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत जागतिक फुटबॉलमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामगिरीकडे भारतीय फुटबॉलप्रेमींचे विशेष लक्ष असणार आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.