आधी क्रिकेट, मगच लग्न! क्रिकेटर रिंकू सिंहने घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा

हिंदुस्थानी क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पार्टीची खासदार प्रिया सरोज यांचा (8 जून) साखरपुडा पार पडला होता. परंतु आता मात्र त्यांच्या लग्नाच्या तारखेबाबत एक महत्त्वाचे वृत्त हाती येत आहे. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे. रिंकू आणि प्रिया वाराणसीतील हॉटेल ताजमध्ये लग्न करणार होते.
18 नोव्हेंबरला क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचे लग्न होणार होते. परंतु नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत रिंकू सिंहच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळेच आता या सोहळ्यासाठी केलेले हॉटेल बुकिंग देखील रद्द करण्यात आलेले आहे. आता सध्याच्या घडीला दोन्ही कुटुंबे लग्नाची नवी तारीख ठरवण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच लग्नाच्या नव्या तारखेबद्दल अद्याप कोणतेच खात्रीशीर वृत्त हाती आलेले नाही.
रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याचा समारंभ लखनऊमध्ये पार पडला होता. यावेळी अनेक नामांकितांनी हजेरी लावली होती. या समारंभामध्ये केवळ किक्रेट जगतातीलच नव्हे तर, राजकारणातील अनेक मातब्बर मंडळी उपस्थित होती. प्रिया सरोज या साखरपुड्याच्या वेळी खूप भावनिक झालेल्या दिसून आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांना आवरता आले नव्हते, याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
Comments are closed.