सूर्याची सावली मुंबईवरून हटणार? सोशल मीडियावरच्या ‘अनफॉलो’ खेळीने चर्चांना उधाण
हिंदुस्थानी क्रिकेटमधील ‘360 अंशांचा’ फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा चर्चेत आहे; पण यावेळी फटकेबाजीमुळे नव्हे, तर इन्स्टाग्रामवरील एका शांत पण धक्कादायक हालचालीमुळे. सूर्यकुमारच्या प्रोफाइलवरून मुंबई इंडियन्सशी संबंधित बहुतांश छायाचित्रे गायब झाली आहेत. इतकेच नव्हे तर, त्याने मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हार्दिक पंड्यालाही ‘अनफॉलो’ केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सूर्याची सावली मुंबईपासून हटणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
आयपीएल 2026 मध्ये सूर्यकुमारच्या बॅटमधून चौकार-षटकारांची फटकेबाजी आटली होती. त्याने 13 डावांत केवळ 270 धावा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूंनी टीकास्त्रंही सोडली जात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याची सरासरी 20.77 आणि फक्त दोन अर्धशतके. त्यातच मुंबई इंडियन्सची नवव्या स्थानावर झालेली घसरण. त्यामुळे 2018 पासून संघाचा कणा असलेल्या सूर्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे, हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेण्यात आले.
सूर्यकुमारचे नुसते पदच नाही, तर श्रेयस अय्यरकडे धुरा सोपविल्यानंतर तो आपोआप संघाबाहेरही फेकला गेला. तेव्हा अश्विन त्याच्यामागे उभा राहिला आणि त्याला फलंदाज म्हणून संघात कायम ठेवायला हवे होते, असे मत त्याने जाहीरपणे मांडत निवड समितीला चांगलेच सुनावले होते. त्यामुळे आता एकच प्रश्न अवघ्या क्रिकेटविश्वाला छळतोय की, सूर्य मुंबईच्या क्षितिजावर पुन्हा उगवणार, की तो नव्या आकाशाचा शोध घेणार?
Comments are closed.