इंडिगोचा मुद्दा संसदेत गाजला
काँग्रेसकडून मुद्दा उपस्थित : सरकारकडून राज्यसभेत शंकांचे निरसन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सोमवारी इंडिगोच्या ऑपरेशनल संकटाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. इंडिगोच्या ऑपरेशनल अडचणींमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीचा उल्लेख करत काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सभागृहात यासंबंधी आवाज उठवला. सरकारकडून हे संकट सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत हे सांगण्यात यावे, असे ते म्हणाले. तसेच राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला असून केंद्रीय विमानवाहतूक मंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. विमान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची खात्री करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच गौरव गोगोई यांनी इंडिगोचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सभागृहात येऊन या प्रकरणावर उत्तर देतील असे आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी गोगोई यांना दिले. त्यानंतर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या वंदे मातरमच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनंतर गोगोई यांनीही या विषयावर भाषण दिले.
राज्यसभेत तामिळनाडूच्या खासदाराचा प्रश्न
राज्यसभेतही विमान वाहतूक संकटाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तामिळनाडूमधून निवडून आलेले एआयएडीएमके खासदार एम. थंबीदुराई यांनी गेल्या सहा दिवसांत उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाय म्हणून सरकारने अधिक गंभीर प्रयत्न करायला हवे होते, असे सांगितले. तसेच सरकारने प्रवाशांचे भाडे परत करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु एअर इंडियाने प्रवाशांकडून 25,000 रुपयांपर्यंत भाडे आकारले जात होते. भाड्यावर सरकारचे नियंत्रण का नाही? असा प्रश्नही उपस्थित केला.
सरकारचे उत्तर
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सभागृहाला संबोधित केले. सर्वसामान्य प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल सरकारला खेद असल्याचे ते म्हणाले. तसेच गेल्या दोन-चार दिवसात 5,86,705 पीएनआर रद्द करण्यात आले, म्हणजेच या क्रमांकावर विमान तिकिटे बुक करणाऱ्या लोकांना त्यांचा प्रवास पुढे ढकलावा लागला. त्या बदल्यात प्रवाशांना कंपनीकडून 569 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत, असेही जाहीर केले. इंडिगो कंपनीचा संदर्भ देताना जिथे उल्लंघन झाले तिथे सरकारने कठोर कारवाई केली आहे. दोषींना शिक्षा झाली आहे. हा विषय सरकारने गंभीरपणे घेतला असून भविष्यात असे प्रसंग उद्भवू नयेत यासाठीही योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. मर्यादित संख्येतील उ•ाणांमुळे अजूनही काही अडचणी येत असून सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी काळजी घेत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Comments are closed.