'तो 38 वर्षांचा वाटत…', इरफान पठानची रोहित शर्मावर कौतुकाची उधळण!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार ऑलराउंडर आणि सध्या लोकप्रिय समालोचक असलेला इरफान पठाणने टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माची भरभरून स्तुती केली आहे. वयाची 38 वर्षे पूर्ण करत असतानाही रोहितची मैदानावरील तंदुरुस्ती आणि धडाकेबाज फलंदाजी पाहून तो प्रभावित झाला आहे. पठाणच्या मते, रोहित सध्या आपल्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहेत.

पठाणने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “रोहित शर्मा आता 38 वर्षाचा आहे असे अजिबात वाटत नाही. त्याने आपली फिटनेस सुधारली आहे आणि त्याचे सरळ प्रतिबिंब त्याच्या खेळावर दिसत आहे. परिस्थितीनुसार शॉट सिलेक्शन, शांतता आणि अचूकता. सगळं काही एकदम परफेक्ट आहे. त्याने काढत असलेली प्रत्येक धाव त्यांच्या माइंडसेटची साक्ष देते.”

रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहितने 51 चेंडूत 57 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. मागील तीन सामन्यांपासून रोहित सातत्याने धावा करत असून त्यात एका शतकाचाही समावेश आहे. पठाणच्या मते, अशा प्रकारची फलंदाजी रोहितच्या नव्या उत्क्रांतीचे लक्षण आहे.

आयपीएल 2025 पर्यंत रोहितची फिटनेस विशेष चांगली नसल्याचे मानले जात होते. मात्र कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्याने स्वतःवर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली. फिटनेस सुधारण्यासाठी त्याने सुमारे 10 ते 15 किलो वजन कमी केले आणि आपले पूर्ण लक्ष वनडे फॉरमॅटवर केंद्रित केले. त्याचा प्रमुख उद्देश वर्ल्ड कप 2027 पर्यंत भारतासाठी खेळणे आहे.

विराट कोहलीसारखीच वाट निवडत, रोहितनेही टी20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटही सोडले. या दोघांनीही अलीकडच्या चार वनडे सामन्यांत जबाबदारीपूर्वक खेळ केला असून प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

भारतीय संघात तरुण खेळाडूंच्या गर्दीत वरिष्ठ खेळाडूंची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. रोहितची फिटनेस, अनुभव आणि सातत्य पाहता तो अजून काही वर्षे भारतासाठी निर्णायक भूमिका बजावेल, हे मात्र नक्की.

Comments are closed.