राज्यात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही शोकांतिका – राजू शेट्टी

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नसणे ही लोकशाहीतील शोकांतिका असून, ज्याप्रमाणे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही, तीच परंपरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चालवित आहेत. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्याचा स्वातंत्र्यानंतरचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे मत शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
आज नांदेड जिल्ह्याच्या एक दिवसीय दौर्यासाठी त्यांचे आगमन झाले त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रासारख्या प्रगत व लोकशाही मानणार्या राज्यात दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसणे ही शोकांतिका असून, विरोधी पक्षनेता हा जनतेचा आवाज असतो. ज्यामुळे जनतेच्या प्रश्नाला धार मिळते. संख्याबळाचे कारण दाखवत विरोधी पक्षनेता न करणे हे कुठल्या नियमात बसते. अनेकवेळा यापेक्षाही कमी संख्याबळ असताना देशात, विविध राज्यात विरोधी पक्षनेते पद देण्यात आले. मात्र राज्याचे मुख्यमंत्री सलग तीन अधिवेशन झाली. विधानसभेचा विरोधी पक्षनेता नियुक्त करत नाहीत. तसेच रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही. तुम्हाला प्रचंड बहुमत असताना विरोधी पक्षनेत्याची भिती तुम्हाला का वाटते, असा सवाल शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

Comments are closed.