ठेकेदाराचा निष्काळजीपणा, महिलेचा हात फॅक्चर; दांपत्याचा गेल्या 13 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

कुर्ला न्यूज मुंबई: कुर्ला रेल्वे स्थानकावरील निष्काळजीपणामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेने ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी गेल्या 13 तासापासून पोलीस ठाण्याच्या बाहेर  बसून आपली न्यायाची मागणी लावून धरली आहे. इंदू पगारे (वय 52), या कल्याणमधील आंबिली परिसरात राहतात व कुर्ला येथे केअरटेकर म्हणून काम करत होत्या. 26 जून रोजी त्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरल्या असताना, तिथे सुरू असलेल्या फरशी बसवण्याच्या कामात सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. कामाच्या ठिकाणी ना बॅरिकेटिंग होतं, ना कोणतीही सूचना फलक. या निष्काळजीपणामुळे पगारे या खुल्या खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ भाभा रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार दिल्यानंतर, त्यांना के. एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला.

दरम्यान, अपघातानंतर बरं वाटल्यानंतर इंदू पगारे यांनी थेट कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करून न घेता अपमानास्पद वागणूक देत तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पगारे दांपत्याचा गेल्या 13 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

पगारे दांपत्याचे म्हणणे आहे की, “तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, आम्ही काही करत नाही,” असे उत्तर पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे पगारे दांपत्य 13 तास पोलीस ठाण्याबाहेर बसून आहे. त्यांनी पुढे अस सांगितले की, “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाणं सोडणार नाही.” परिणामी कला संध्याकाळी पाच वाजल्यापासून कुर्ला लोहमार्ग पोलीस स्टेशनबाहेर न्यायासाठी वयोवृद्ध दाम्पत्य ठिय्या मांडून बसलं असल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकावर भरदिवसा चोरी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

बदलापूर रेल्वे स्थानकावर भरदिवसा चोरीची घटना समोर आली असून, एका चोरट्याने रेल्वे ट्रॅकवरील नाल्यातून लोखंडी जाळी चोरून ती लोकल ट्रेनमध्ये टाकली आणि ट्रेननेच पळ काढला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईकडे जाणारी लोकल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत असताना, एका चोरट्याने ट्रॅकवरील नाल्यावरील लोखंडी जाळी उचलून थेट चालू लोकलमध्ये फेकली आणि नंतर स्वतःही त्याच ट्रेनमध्ये चढून पसार झाला. ही घटना शुक्रवार  18 जुलैला दुपारी साधारणतः 1.30 च्या सुमारास घडली आहे .

या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा फज्जा उडाला असून, यापूर्वीही अशा घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याची माहिती जीआरपीकडून मिळाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.