दिग्गज फलंदाज रॉबिन स्मिथ यांचे निधन, क्रिकेटचा जज खुर्चीतून उठून अनंतात विलीन

इंग्लंडचे माजी कसोटीपटू आणि हॅम्पशायरचे महान फलंदाज रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने इंग्लंडसह जागतिक क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. मैदानात उभे राहिल्यावर निर्णय देणाऱ्या न्यायाधीशासारखेच त्यांचा महिमा होता. निर्भय, ठाम आणि न्याय्य पण विरोधी गोलंदाजांसाठी भयानक असलेले स्मिथ हे क्रिकेटचे जज होते. त्यांना ‘द जज’ हा किताबही देण्यात आला होता. आता हा जज अनंतात विलीन झाल्याची भावना अवघ्या क्रिकेटविश्वाची होती. पर्थ येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी त्यांचे निधन झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर ते जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून कळविण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे जन्मलेले स्मिथ ‘द जज’ या टोपणनावाने ओळखले जात होते. त्यांनी 1988 ते 1996 या कालावधीत इंग्लंडकडून 62 कसोटी आणि 71 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी आपल्या कसोटी कारकीर्दीत 4236 कसोटी धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 9 कसोटी शतकांची नोंद आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध अँटिग्वा येथे 1994 मध्ये केलेली 175 धावांची झुंजार खेळी त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम मानली जाते.
वेगवान गोलंदाजांविरुद्ध निर्भय फलंदाजी हे स्मिथ यांचे वैशिष्टय़ होते. वेस्ट इंडीजच्या खतरनाक वेगवान माऱ्यासमोर खंबीरपणे उभे राहणाऱया इंग्लंडच्या मोजक्या फलंदाजांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे. त्यामुळेच त्या काळात इंग्लंडच्या मधल्या फळीचे ते आधारस्तंभ होते.
स्मिथ यांनी हॅम्पशायर संघाचे 1998 ते 2002 या काळात नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने जोरदार कामगिरी केलीय. तसेच 1988 आणि 1992 मध्ये बेन्सन ऍण्ड हेजेस करंडक, तर 1991 मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

Comments are closed.