महाकुभ मेळ

विक्रमी 64 कोटींहून अधिक भाविकांचा सहभाग, 30 लाखांहून अधिक विदेशी भाविकांचाही समावेश

वृत्तसंस्था / प्रयागराज (उत्तर प्रदेश)

महाशिवरात्रीच्या अंतिम पवित्र स्नानासह यावर्षीच्या महाकुंभमेळ्याची भव्य सांगता झाली आहे. अखेरच्या दिनी 3 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नानाची अंतिम पर्वणी साधली आहे. 45 दिवस चाललेल्या या हिंदू धर्माच्या सर्वात मोठ्या सोहळ्यात देशभरातील 64 कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. यांमध्ये 30 लाखांहून अधिक विदेशी भाविकांचाही समावेश होता. हा भाविकांच्या संख्येचा आतापर्यंतचा विक्रम आहे. हिंदू संस्कृतीत अत्याधिक महत्व असलेल्या या पर्वणीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रशासनाने भाविकांचे आभार मानले आहेत.

गंगा, यमुना आणि गुप्त असणारी सरस्वती या हिंदूंसाठी अतिपवित्र असणाऱ्या तीन नद्यांच्या संगमस्थानी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे या महाकुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक 12 वर्षांनंतर केले जाते. त्यामुळे यापुढील महाकुंभ 2037 मध्ये होणार आहे. या महाकुंभाचा प्रारंभ 13 जानेवारीला झाला होता. प्रारंभापासूनच त्याला प्रचंड प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यात प्रारंभ झाला होता. अतिप्रचंड संख्येने भाविकांची उपस्थिती राहणार, हे गृहित धरुन उत्तर प्रदेश प्रशासनाने सुरक्षा आणि सुविधा यांची यथायोग्य व्यवस्था ठेवली होती. 29 जानेवारीला संगमस्थानावर झालेली चेंगराचेंगरी आणि त्यानंतर काही दिवसांनी महाकुंभमेळ्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांची चेंगराचेंगरी असे काही अपवाद वगळता हा महासोहळा यथासांगपणे आणि परंपरेनुसार पार पडला आहे.

हजारो एकरांमध्ये व्यवस्था

यंदाच्या महाकुंभमेळ्याला भाविकांच्या संख्येचा विक्रम होणार, याची जाणीव असल्याने उत्तर प्रदेश राज्य प्रशासनानने आणि प्रयागराज्यच्या स्थानिक प्रशासनाने अतिभव्य प्रमाणात सज्जता केली होती. भाविकांच्या निवासासाठी संगमस्थानानजीच्या हजारो एकर भूमीवर दोन लक्षांहून अधिक तंबू आणि राहुट्या उभ्या करण्यात आल्या होत्या. पिण्याचे स्वच्छ पाणी आणि आहार यांची व्यवस्था करण्यात आली होती. फिरती स्वच्छतागृहेही मोठ्या संख्येने उपलब्ध करण्यात आली होती. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आणि कचऱ्यांचे ढीग सत्वर हलविण्यासाठीही योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे, इतक्या मोठ्या प्रमाणात भाविकांचे आगमन झाले असूनही ही महापर्वणी सुरळीत पार पाडण्यात प्रशासनाला यश आले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

या महाकुंभमेळ्याला दहशतवादी आणि हिंसाचारी कुशक्तींकडून अडथळा आणला जाऊ शकतो, हे गृहित धरुन सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलांच्या अनेक तुकड्या संगमस्थानानजीक तसेच संगमावरील विविध घाटांवर नियुक्त करण्यात आल्या होत्या. भारतीय सेनेलाही सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली होती. आपत्कालीन स्थितीचा त्वरित निपटारा करण्यासाठी केंद्रीय आपदा साहाय्यता दले आणि उत्तर प्रदेशची आपत्कालीन साहाय्यता व्यवस्था सज्ज होती. अनेक खासगी आणि सेवाभावी संस्थांनीही हा महासोहळा पार पाडण्यासाठी साहाय्य केले.

नागा साधूंचे काशीला निर्गमन

महाकुंभकाळात प्रयागराज येथे वस्ती केलेल्या लक्षावधी नागा साधूंनी परंपरेप्रमाणे अंतिम दिनी काशी या पवित्र तीर्थक्षेत्री निर्गमन केले. काशीक्षेत्रीही त्यांच्या स्वागतासाठी मोठी सज्जता करण्यात आली आहे. काशीनगरीमध्ये दिव्यांची आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून काशी विश्वनाथाच्या जगप्रसिद्ध मंदिरासह नगरीतील सर्व मंदिरे सजविण्यात आली आहेत. महाशिवरात्रही काशीक्षेत्री अत्यंत उत्साहात प्रत्येक वर्षी साजरी केली जाते. यावेळी काशीतील शिवरात्रीला महाकुंभपर्वर्णीची जोड मिळाल्याने हा उत्साह शतगुणित झाल्याचे दिसून येत आहे.

अयोध्येतही मोठी लगबग

अयोध्येतील रामजन्मभूमीस्थानी भगवान रामलल्लांच्या भव्य मंदिराचे निर्माणकार्य झाल्यापासूनचा हा प्रथम महाकुंभमेळा आहे. त्यामुळे महाकुंभमेळ्याला आलेल्या बहुतेक सर्व भाविकांनी अयोध्येत जाऊन भगवान रामलल्लांचेही दर्शन घेतले. त्यामुळे संपूर्ण महाकुंभ पर्वणीकाळात अयोध्येतही भाविकांची प्रचंड संख्या होती. या पर्वणीच्या अंतिम दिनीही अयोध्या नगरीत भाविकांनी भगवान रामलल्लांच्या मूर्तीला जलाभिषेक केला. अयोध्येतही स्थानिक प्रशासनाने सुयोग्य व्यवस्था ठेवली होती.

भारतीय वायुदलाचे भव्य प्रदर्शन

महाकुंभमेळ्याच्या अंतिम दिनी भारतीय वायुदलाने एका भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या सामर्थ्याचे दर्शन कोट्यावधी उपस्थितांना घडविले. या एअरो शोमध्ये सुखोई, मिग, मिराज आणि इतर अत्याधुनिक युद्धविमानांचा समावेश होता. तसेच भारतीय वायुदलाची हेलिकॉप्टर्स आणि अन्य साधनांचेही दर्शन उपस्थितांना झाले. 50 हून अधिक युद्ध विमानांनी या प्रदर्शनात भाग घेतला, अशी माहिती देण्यात आली आहे. भक्तीसमवेत शक्तीचाही परिचय यामुळे भाविकांना झाला.

प्रचंड आर्थिक उलाढाल

विक्रमी भाविकसंख्या लाभलेल्या या महाकुंभमेळ्याची आर्थिक उलाढालही विक्रमी होती अशी माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने या महोत्सावाच्या व्यवस्थेसाठी 25 हजार कोटींहून अधिकचा व्यय केला आहे. तसेच यातून मिळालेले राजस्वही 2.25 लाख कोटी रुपयांचे आहे, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. असंख्य स्थानिकांना या पर्वणीकाळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय उपलब्ध झाला होता. भाविकांना त्यांच्या आवश्यकतांनुसार वस्तू, सेवा अणि साधने पुरविणाऱ्या स्थानिकांचाही मोठा लाभ झाला. भाविकांना संगमस्थळी घेऊन जाण्यासाठी दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनचालकही सज्ज होते. त्यांनाही या काळात मोठ्या व्यवसायाची संधी मिळाली, असे दिसून येते.

तंत्रज्ञानाचेही महत्वपूर्ण योगदान

या महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात यावेळी प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मोठे योगदान दिले आहे. विशेषत: सुरक्षाव्यवस्था, जमावव्यवस्थापन, भाविकांना सूचना देणे, हरविलेल्या किंवा मार्ग चुकलेल्या भाविकांचा शोध घेणे, विविध सुरक्षा दले, अग्निशामक दले, आरोग्य व्यवस्थेचे सूत्रसंचालन, भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, भाविकांच्या संख्येची माहिती मिळविणे, प्रशासन आणि भाविक यांच्यात सातत्याने संपर्क ठेवणे, इत्यादी कार्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याने युक्त असणारी विविध साधने यांच्या मोठा उपयोग करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सढळ हस्ते उपयोग केला गेलेला हा प्रथम महाकुंभमहोत्सव ठरला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे महाकुंभमेळ्याचे व्यवस्थापन सुयोग्य रितीने झाले आहे.

देशभर महाशिवरात्री उत्साहात

महाशिवरात्रीचा उत्सव बुधवारी देशभरात अतिव उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. देशभरातील सर्व लहान-मोठ्या शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजाआर्चा, दर्शन आणि अनुष्ठानांसाठी भाविकांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानीतर लक्षावधी भाविक उपस्थित होते. भगवान शंकरांचा जयजयकार करण्यात आला. उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला आहे.

महाकुंभमेळ्याच्या आठवणींनी भाविक सद्गदित

ड महाकुंभमेळ्याच्या अंतिम स्नानदिनी 3 कोटींहून अधिक भाविक उपस्थित

ड प्रशासनाकडून उत्तम व्यवस्थापन केले गेल्याने अंतिम दिवस सुखरुपपणे पार

ड अंतिम दिनी संगमस्थानी सुरक्षा व्यवस्था कडेकोट, प्रशासनाची योग्य दक्षता

ड भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक वायुप्रदर्शनामुळे भक्ती-शक्तीचा महासंगम

ड महाकुंभमेळ्याला भाविकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रशासनालाही समाधान

Comments are closed.