लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकवटला!
शिवसेना, मनसे व महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा आज दणक्यात पार पडला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आज मुंबईत महाराष्ट्र एकवटला. असह्य उकाड्यातही सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून एकदिलाने मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मतदार यादीतील घोळ व मतचोरीच्या विरोधात निघालेल्या या भव्य मोर्चात सामील होत खऱ्या मतदारांनी भाजप व निवडणूक आयोगाविरोधात आक्रोश केला. जोरदार घोषणाबाजीने फॅशन स्ट्रीटपासून ते महापालिका मुख्यालयापर्यंतचा परिसर अक्षरशः दणाणून गेला होता. निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ‘सत्याचा मोर्चा’तून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला
राज ठाकरे यांचा लोकल प्रवास!
सत्याचा मोर्चा या ठिकाणी पोहोचण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई लोकलने दादर ते चर्चगेट असा प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेतेही सोबत होते. राज ठाकरे दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचताच माध्यमांनी प्रचंड गर्दी केली. राज ठाकरे मोर्चाच्या दोन तास आधीच चर्चगेट स्टेशनवर पोहोचले.
एक व्यक्ती 12 ठिकाणी मतदार
शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिह्यातील कार्यकर्त्या तेजस्वी घरत यांनी आपल्यासोबत खारघर वॉर्ड नं 4 येथील यादी आणली होती. या यादीत एकाच व्यक्तीच्या नावे 12 ठिकाणी मतदान आहे, हा निवडणूक आयोगाचा घोळ त्यांनी चव्हाट्यावर आणला. निवडणूक आयोगाचे अधिकारी हे कुणासाठी काम करतायत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सत्याचा मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते व खरे मतदार एकवटले होते. या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी मुंबई पोलीस तैनात होते. शिवाय या संपूर्ण परिसरात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप या पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते
लोकशाहीसाठी जागे व्हा!
सत्याच्या या मोर्चामध्ये वयोवृद्धदेखील तितक्याच जोशात सहभागी झाले होते. 79 वर्षीय तुकाराम आमृतकर हे आजोबा ठाण्यातून मोर्चासाठी आले होते. ‘माणसा माणसा जागा हो… लोकशक्तीचा धागा हो’ असे बॅनर त्यांनी झळकावले. शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाच्या प्रत्येक मोर्चा आणि आंदोलनात आपण सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रीक्स किंवा मुले
घाटकोपर येथून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राजेश सावंत यांनी मोर्चामध्ये ‘चले जाव भाजप, गो बॅक बीजेपी’ अशी जोरदार नारा दिला. ब्रिटिशांनी हिंदुस्थानवर जो अत्याचार केला त्यानिमित्ताने 1942 साली ‘गो बॅक सायमन’ ही चळवळ उभी राहिली. हीच चळवळ आज बॅनरच्या रुपाने मोर्चात दिसली.
लोकशाही गिळू इच्छिणाऱ्या अॅनाकोंडाचे फलक
भाजपवाले मतचोरीच्या माध्यमातून सत्तेवर आले. मग सत्तेचा दुरुपयोग करत ते आता लोकशाहीचा गळा घोटू लागले आहेत. भाजपरूपी अॅनाकोंडा लोकशाही गिळायला आ वासून आहे. या अॅनाकोंडाला आता ठेचावेच लागेल अशा आशयाचे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
इंग्लंडचा एडनदेखील अवाक्!
भारत भेटीवर आलेला इंग्लंडचा एडन हादेखील सत्याच्या मोर्चात सहभागी झाला होता. विराट जनसमुदाय पाहून तोही अवाक् झाला. इतके लोकं कशासाठी जमलेत, त्यांची मागणी काय आहे, इतकं गरम वातावरण असतानाही लोकं कशाला एकवटली, असे प्रश्न विचारून त्यांनी शिवसैनिकांकडून माहिती जाणून घेतली. एडनला शिवसेना आणि मनसेचा गमछा गळ्यात टाकायचा मोहदेखील आवरला नाही. गमछा घालूनच तोही मोर्चाला पाठिंबा देताना दिसला.
उघडा डोळे, मतदार याद्या तपासा नीट
निवडणूक आयोगाशी मिलीभगत करून भाजपने मतचोरीचे कारस्थान केले आहे. मतांची चोरी करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आता चालणार नाही. आताच जर डोळे उघडले नाही तर भविष्यात काय बिकट परिस्थिती उद्भवेल याचा नेम नाही. त्यामुळे उघडा डोळे आणि मतदार याद्या तपासा नीट… अशी वेळ आली आहे. प्रत्येकाने मतदार यादी तपासून आपले व आपल्या कुटुंबीयांची नावे नीट आहेत की नाही याची खातरजमा करून घ्यायला हवी, असे सांगत बोरिवलीचा विपुल सत्याच्या मोर्चात सहभागी झाला होता.
शिवसेनेच्या फायर आजी
चंद्रभागा शिंदे हातात भगवा झेंडा घेऊन सत्याच्या मोर्चात सहभागी झाल्या.
संविधान वाचवा लोकशाही जगवा
कल्याण येथून मोर्चासाठी आलेले राहुल देवकर हे आपल्यासोबत संविधानाची प्रत घेऊन आले होते. ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा’ हा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला.
विधी आयोगाची निवड केली
बोगस मतदारांना पाठीशी घालणाऱ्या निवडणूक आयोगाविरोधात सर्वत्र संताप दिसत आहे. ‘बोगस मतदार चुना लाव आयोग, आता नाही चालणार मतचोरीचा प्रयोग’ असे म्हणत निवडणूक आयोगाला या बॅनरद्वारे आरसा दाखवला आहे.
रेल्वे स्थानके, परिसर घोषणाबाजीने दणाणला
दूरदूरहून कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्यासाठी जथेच्या जथे दक्षिण मुंबईत धडकले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, मरीन लाईन्स या स्थानकांमध्ये जोरदार घोषणाबाजी करून आसमंत दणाणून सोडला. ‘मतचोरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय…’, ‘मत चोरणाऱ्या कमळाबाईचा निषेध असो’, ‘करावा लागेल करावा लागेल अॅनाकोंडाचा खात्मा करावा लागेल’, ‘उघडा डोळे बघा नीट, मतदार याद्या आहेत का नीट…’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मनसेना झिंदाबाद…’ अशा घोषणा देत कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी कूच करताना दिसत होते. फॅशन स्ट्रीट ते मेट्रो सिनेमापर्यंतचा मार्ग मोर्चेकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
Comments are closed.