पैसे पकडल्यावर भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांशी मांडवली? निलेश राणेंनी ‘तो’ व्हिडीओच दाखवला


मालवण नगरपरिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषद निवडणुकीमुळे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप यांच्यातील तीव्र संघर्षामुळे चर्चेचा विषय ठरत असलेल्या मालवणमध्ये (Malvan News) मतदानाच्या आदल्या रात्री हायव्होल्टेज ड्रामा झाला. मालवणमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री नाकाबंदीवेळी एक कार पकडली. ही कार भाजपचे भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांची होती. या गाडीत दीड लाखांची रोकड सापडली. त्यामुळे पोलिसांनी कारसकट भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्याला मालवण पोलीस ठाण्यात नेले. यानंतर काहीवेळातच ही बातमी समजल्यावर निलेश राणे (Nilesh Rane) हेदेखील पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांना अद्याप भाजप पदाधिकाऱ्यांवर  गुन्हा का दाखल झाला नाही, असे सवाल विचारत फैलावर घेतले. नेमक्या त्याचवेळी पोलीस ठाण्याच्या आवारात आणखी एक कार आली. या कारमधील व्यक्ती भाजपच्या लोकांना सोडवायला आल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कारच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला कोणतीही नंबरप्लेट नव्हती. गाडीच्या पुढच्या सीटवर भाजपचे चिन्ह असलेला गमछा होता.

निलेश राणे यांच्या आरोपानंतर मालवण पोलीस ठाण्यात आलेली नंबरप्लेट नसलेली ही गाडी कोणाची आहे, अशी चर्चा रंगली होती. नंबरप्लेट नसल्यास सामान्य वाहनचालक पोलिसांच्या आजूबाजूलाही फिरकायची हिंमत सहसा करणार नाहीत. मात्र, ही कार थेट पोलीस ठाण्यात कशी आली, याची चर्चा रंगली आहे. निलेश राणे यांनी नंबरप्लेट असलेली कार तातडीने जप्त करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलीस आता या कारच्या मालकावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Nilesh Rane in Malvan: पैसे ठेवून घ्या, कार्यकर्त्यांना सोडा, भाजपची पोलिसांसोबत मांडवली?

पोलिसांच्या विशेष पथकाने दीड लाखांची रोकड असलेली गाडी पकडल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले. भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करुन घेतली. मात्र, निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी बाबा परब हा पोलिसांशी प्रकरण मिटवण्यासाठी वाटाघाटी करत असल्याचा आरोप केला. निलेश राणे यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत भाजपचा एक कार्यकर्ता पोलिसांशी बोलताना दिसत आहे. ‘तुम्ही गाडीत सापडलेले पैसे ठेवून घ्या, पण कार्यकर्त्यांना सोडा’, असे हा भाजपचा पदाधिकारी पोलिसांना सांगताना दिसत आहे. मात्र, पोलिसांनी निवडणूक अधिकारी याठिकाणी आले असून त्यांना तपास करायचा आहे, असे सांगताना दिसत आहेत.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.