मराठी भाषा भवनाचे काम अखेर सुरू, उद्धव ठाकरे यांनी घेतला होता पुढाकार

मराठी भाषेचा विकास व संवर्धन करण्यासाठी तसेच जगभरातील मराठी भाषकांना जोडण्यासाठी चर्नी रोड येथे महाविकास आघाडीच्या काळात मराठी भाषा भवन उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला होता; पण महायुती सरकारने मागील तीन वर्षांत या प्रकल्पाच्या इमारतीची एक वीटही रचली नव्हती. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरल्यामुळे अखेर मराठी भाषा भवनाच्या उभारणीला मुहूर्त सापडला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत चर्नी रोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात पुढाकार घेतला. 2022 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते, पण त्यानंतर राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारने मराठी भाषा भवनासाठी 260 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांनुसार मराठी भाषा भवनाच्या आराखड्यात बदलही करण्यात आले आहेत.
मराठी भाषा भवनात काय असेल
मराठी भाषेची परंपरा, प्राचीनत्व आणि मराठी भाषा अभिजात कशी होती यासाठी मराठी भाषेचा इतिहास तीन कालखंडात प्रामुख्याने मांडण्यात येणार आहे. त्यात एक दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंडात मराठी भाषेची प्रगती कशी झाली आणि तेव्हाची स्थिती कशी होती. पुढे ब्रिटिश कालखंडात मराठी भाषेचा प्रवास आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंतच्या आधुनिक कालखंडातील मराठी भाषेचा प्रवास यामध्ये असेल. मराठी वाङ्मय, साहित्य, लोककला, बोलीभाषा, मराठी जनजीवन यांची स्थित्यंतरे काळाप्रमाणे कशी होत गेली याची नव्या पिढीला माहिती दिली जाईल. साहित्य, कला व संस्कृती त्या काळात कशी होती हे दाखवण्यात येईल. त्यावर आता काम सुरू आहे. त्याशिवाय अॅम्फी थिएटर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल.
Comments are closed.