टांझानियात मतचोरीविरोधात जनक्षोभ, विद्यमान अध्यक्षांना मिळाली तब्बल 98 टक्के मते; संतप्त मतदार लाखोंच्या संख्येने रस्त्यावर

पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशात मतचोरीच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला आहे. टांझानियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांना तब्बल 98 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मतदारांना धक्का बसला आहे. आपली फसवणूक झाल्याच्या भावनेने लाखो लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. तेथील विरोधी पक्षांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे चौकशीची मागणी केली आहे.

टांझानिया स्वतंत्र झाल्यापासून या देशात सीसीएम या पक्षाची सत्ता आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मागील आठवडय़ात झालेल्या निवडणुकीत एकूण 3.2 कोटी लोकांनी मतदान केले. त्यापैकी 3.1 कोटी मते विद्यमान अध्यक्ष हसन यांना मिळाली. विरोधी पक्षांनी या निकालावरच आक्षेप घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचाही आक्षेप

आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षकांनीही टांझानियातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. टांझानियाच्या लोकशाहीवर हा ‘काळा डाग’ असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात टांझानियात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Comments are closed.