इंडोनेशियात भर समुद्रात प्रवासी जहाजाला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या समुद्रात उड्या

भर समुद्रात प्रवासी जहाजाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना इंडोनेशियात घडली आहे. जहाजाला आग लागताच घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. उत्तर सुलावेसीतील तालिस बेटाजवळील केएम बार्सिलोना व्हीए जहाजात अचानक आग लागली. या आगीची भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
जहाजात 280 हून अधिक लोक होते. प्रवाशांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच इंडोनेशियन शोध आणि बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
आगीची घटना एका महिला प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओत जीव वाचवण्यासाठी जहाजातील लोक समुद्रात उड्या मारताना दिसत आहेत. काहींनी जीवरक्षक जॅकेट घातले आहे तर काहींनी जॅकेट घातले नाही. जवळच्या टॅलिस बेटावरून जाणाऱ्या अनेक मासेमारी करणाऱ्या बोटींनी पाण्यातून काही प्रवाशांना वाचवले आणि त्यांच्या बोटीने किनाऱ्यावर आणले.
Comments are closed.