MCA Election – अजिंक्य नाईक अध्यक्ष, जितेंद्र आव्हाड उपाध्यक्ष; कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची निवड

>> गणेश पुराणिक, मुंबई
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अध्यक्षपदी अजिंक्य नाईक आणि टी20 गव्हर्निंग कौन्सिलसाठी राजदीप गुप्ता यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर इतर पदांसाठी बुधवारी निवडणूक पार पडली. दुपारी 3 ते 6 या काळात MCA चे सदस्य, माजी खेळाडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 9 नंतर निकाल जाहीर झाला.
उपाध्यक्षपदाच्या लढतीत जितेंद्र आव्हाड यांनी 201 मते मिळवत नवीन शेट्टी (195 मते) यांचा पराभव केला. सचिवपदासाठी डॉ. उन्मेष खानविलकर यांनी 227 मते मिळवत शाह आलम शेख (129 मते) यांच्यावर विजय मिळवला. सहसचिवपदावर निलेश भोसले यांनी 228 मते मिळवत गौरव पयाडे (128 मते) यांचा पराभव केला, तर खजिनदारपदावर अर्मान मलिक यांनी 234 मते मिळवत सुरेंद्र शेवाळे (119 मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
गव्हर्निंग कौन्सिलमध्ये किनी भरत सचिदानंद यांनी 184 मते मिळवत जैन किशोर कुमार (132 मते) यांच्यावर विजय मिळवला. या निवडणुकीत अनेक पदांवर तरुण आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश झाल्याने संघटनेच्या कार्यात नवीन ऊर्जा येण्याची अपेक्षा आहे. एपेक्स कौन्सिलसाठी नऊ सदस्य निवडून आले असून त्यात संदीप विचारे (247), सूरज समत (246), विघ्नेश कदम (242), मिलिंद नार्वेकर (241), भूषण पाटील (208), नदीम मेमन (198), विकास रेपाळे (195), प्रमोद यादव (186) आणि नील सावंत (178) यांचा समावेश आहे. अजिंक्य नाईक यांच्या नेतृत्वाखालील ही नवी समिती लवकरच अधिकृतपणे कार्यभार स्वीकारणार आहे.

Comments are closed.