फोटो न छापल्याने शिवसैनिकांमध्येच जुंपली; पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागताचे बॅनर फाडले

धारशिव: राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) हे सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज उमरग्यामध्ये (Umarga) बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी तयारी देखील केली आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वीच शिवसैनिकांमध्येच जुंपल्याचे बघायला मिळाले आहे. फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले आहे.

फोटो न छापल्याने शिवसैनिकांमध्येच जुंपली, कार्यकर्त्यांनीच फाडले बॅनर

शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे फोटो बॅनरवर नसल्यामुळे हे बॅनर फाडल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी उमरगा शहरात बॅनर लावले होते. उमरगा शहरात विविध ठिकाणी लावलेले आठ ते दहा बॅनर यावेळी फाडल्याचे समोर आले आहे.  आकांक्षा चौगुले यांच्याकडे शिवसेनेचे मराठवाडा युवती सेना पक्ष निरीक्षक म्हणून पदभार आहे. तर किरण गायकवाड यांच्याकडे मराठवाडा युवा सेना पक्षनिरीक्षक पद आहे. मात्र फोटो न छापल्याने कार्यक्रमापूर्वीच शिवसैनिकांमध्येच जुंपली असल्याचे समोर आलं आहे.

उमरगा पोलिसांकडून शोध सुरू

पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. तसेच ते आज बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी उमरग्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडल्याच्या घटनेने काहीसा तणाव निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे हे बॅनर नेमकं कोणी फाडले? याचा उमरगा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे पुन्हा आमदार तानाजी सावंत यांनी फिरवली पाठ

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे पुन्हा आमदार तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले आहे. तर जिल्ह्यात येऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक एकदाही सावंतांच्या मतदारसंघात फिरकले नाहीत अशी देखील चर्चा आहे. दरम्यान, नाराज सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांसह समर्थकही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.  हरित धाराशिव मोहिमेला विशेष निमंत्रित असतानाही तानाजी सावंतांच्या दांडीने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहेत.  हरित धाराशिव उपक्रमाला आमदार तानाजी सावंत यांच्यासह, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे या महायुतीच्या आमदारांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे केवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हरित धाराशिव उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मात्र या नाराजीची चर्चा रंगू लागली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.