चक्रीवादळांचा वाढता `ताप’
>> रंगनाथ कोकणे
हैती आणि डोमिनिकन रिपब्लिक यांसह जमैकामध्ये ताशी 250 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या मेलिसा या प्रचंड धोकादायक पीवादळाचा कहर सुरू असतानाच आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांवर `मोंथा’ या पीवादळाने धडक दिली. बंगालच्या उपसागरात सतत मोठ्या लाटा आणि वादळी प्रवाह निर्माण होत असतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या उपसागराची ट्रपिझोडियल स्थिती हे असून ती वायुमंडलीय हालचालींना एकाच ठिकाणी केंद्रित करते. तथापि जागतिक तापमानवाढीमुळे अलीकडील काळात पीवादळांचे प्रमाण आणि त्यांची तीव्रता वाढत चालली आहे. मागील दशकात अशा पीवादळांमुळे देशात सुमारे 20.4 दशलक्ष लोक प्रभावित झाले असून 51.5 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे.
यंदाचे वर्ष हे ज्या विविध कारणांमुळे गाजणार आहे किंवा त्याची नोंद इतिहासात होणार आहे, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात होणाऱ्या जीवित व वित्तहानीचा उल्लेख अग्रामाने करावा लागेल. त्यातही पीवादळांचा समावेश सर्वात अग्रस्थानी असेल. अलीकडेच मेलिसा या महाभयंकर पीवादळाने कॅरिबियन देश जमैकासह अन्य देशांमध्ये हाहाकार उडवला. या वादळाचा वेग ताशी 282 किलोमीटर इतका असल्याचे समोर आले आहे. यूएस नॅशनल हरिकेन सेंटरच्या (एनएचसी) म्हणण्यानुसार, 2005 मध्ये प्वेर्टो रिकोमध्ये आलेल्या `कॅटरिना’ आणि 2017 मध्ये न्यू ऑलन्समध्ये आलेल्या `मारिया’पेक्षा मेलिसा जास्त धोकादायक होते. अवघ्या 24 तासांतच ते पाचव्या श्रेणीचे पीवादळ बनले. श्रेsणी 5 ही पीवादळाची सर्वात धोकादायक श्रेणी मानली जाते. 2025 मध्ये आतापर्यंत या प्रकारची पाच पीवादळे नोंदवली गेली आहेत. यामध्ये रागासा या फिलिपाइन्समध्ये आलेल्या पीवादळाचा वेग ताशी 262 किमी इतका होता; तर अमेरिकेतील एरीन पीवादळाचा 260, ऑस्ट्रेलियात आलेल्या एरोलचा 260 किमी, बरमुडावर आलेल्या हमबर्टोचा 241 किमी इतका वेग होता.
यादरम्यान आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांवर `मोंथा’ या पीवादळामुळे आलेली नवी नैसर्गिक आपत्ती आपण नुकतीच पाहिली. बंगालच्या उपसागरात सतत मोठ्या लाटा आणि वादळी प्रवाह निर्माण होत असतात. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या उपसागराची ट्रपिझोडियल स्थिती हे असून ती वायुमंडलीय हालचालींना एकाच ठिकाणी केंद्रित करते. बंगालच्या उपसागराचं तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त असतं म्हणून इथं वादळं जास्त बनतात. अलीकडच्या काळात हवामान बदलांमुळे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच अरबी समुद्रातही वारंवार आणि अधिक शक्तिशाली पीवादळं तयार होऊ लागली आहेत.
स्टॉर्म म्हणजे वातावरणातील एक प्रकारचा अस्थिरपणा, जो प्रामुख्याने वेगवान वाऱ्यांच्या स्वरूपात दिसून येतो आणि त्याच्या सोबत पाऊस, बर्फ किंवा गारांचा वर्षाव होतो. जेव्हा अशी वादळे जमिनीवर तयार होतात, तेव्हा त्यांना सामान्य वादळ म्हटले जाते, परंतु जेव्हा ही वादळे समुद्रातून उठतात, तेव्हा त्यांना हरिकेन म्हणतात. हरिकेन ही सामान्य वादळांपेक्षा अधिक प्रचंड आणि धोकादायक असतात. हरिकेन, सायक्लोन आणि टायफून हे तिन्ही एकाच प्रकारच्या वातावरणीय घटनेची वेगवेगळी रूपे आहेत. फक्त प्रदेशानुसार त्यांची नावं बदलतात. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिका आणि कॅरिबियन बेटांमध्ये तयार होणाऱ्या समुद्री वादळांना हरिकेन म्हणतात. फिलिपाईन्स, जपान आणि चीन या प्रदेशांमध्ये येणाऱ्या समुद्री वादळांना टायफून म्हणतात; तर ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागर म्हणजेच भारताच्या आसपासच्या प्रदेशात तयार होणाऱ्या समुद्री वादळांना सायक्लोन म्हटले जाते.
टॉर्नेडो हेदेखील अतिशय वेगवान आणि धोकादायक वादळ असते; परंतु ते सायक्लोन नसते. कारण टॉर्नेडो बहुतेक वेळा जमिनीवरच तयार होतात. जगात सर्वाधिक टॉर्नेडो अमेरिकेत आढळतात.
गतवर्षी मे महिन्यात आलेल्या रामल पीवादळाचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये `आसना’ वादळाने बंगालच्या उपसागरात खळबळ उडवून दिली होती. ‘दाना’ने ऑक्टोबरमध्ये कहर केला होता. पीवादळांमुळे होणारे नुकसान हे प्रचंड मोठे असण्याची भीती असते. गेल्या वर्षी देशात विविध पीवादळांमुळे 278 लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे पाच हजार 334 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद झाली.
जीवित व वित्तहानीचा हा आकडा प्रत्यक्षात अधिक असू शकतो. आभाळ एकदम भरून येणे, सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू होणे ही या वादळाची लक्षणे होत. ही वादळे समुद्रात निर्माण होत असल्याने वाऱ्याचा तडाखा समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशाला प्रामुख्याने बसतो. अचानकपणे मुसळधार पाऊस पडू लागल्याने नद्यांना पूर येतात. झाडे उन्मळून पडणे, वाहतूक बंद पडणे आणि वीज पुरवठा बंद होणे हे या वादळांचे परिणाम असतात. आभाळ भरून आल्याने हवाई वाहतूक आणि समुद्रात लाटा उसळल्याने जलवाहतूक बंद पडते. काही वेळा जहाजे उलटतात, बुडतात. वादळ आणि पूर ही संकटे कमी झाल्यावर पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण होतात. अशुद्ध पाण्यामुळे रोगराई पसरते. विशेषत: कावीळ आणि कॉलरा या दोन विकारांच्या साथी पसरतात. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे पीवादळांमुळे केवळ मालमत्तेचे आणि मानवाचे तत्काळ नुकसान होत नाही, तर त्यांचे पर्यावरणावरही दीर्घकालीन परिणाम होतात. अतिवृष्टीमुळे निर्माण होणारे दलदलीचे क्षेत्र, जोरदार वादळामुळे नष्ट होणारी नैसर्गिक जंगले आणि हिरवळ, प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाची पडझड यामुळे संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडून जातो. सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे किनारी भागात खारे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरते. तसेच शेतजमिनीवर चिखल व दलदल निर्माण होते. या नुकसानीची दुरुस्ती करणे अवघड ठरते.
इंटरगव्हर्नमेंटल ग्रुप ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार, 1970 पासून हरितगृह वायू उत्सर्जनामुळे निर्माण होणारी 90 टक्के अतिरिक्त उष्णता जगातील महासागरांनी शोषून घेतली आहे. त्यामुळे महासागरांचे तापमान कमालीचे वाढत आहे. याचाच परिणाम म्हणजे गेल्या तीन-चार दशकांमध्ये पीवादळे अधिकाधिक धोकादायक बनत चालली आहेत. समुद्राचे तापमान 0.1 अंशाने वाढले म्हणजे पीवादळाला अतिरिक्त ऊर्जा मिळते. पीवादळांमध्ये काही वेळा अनेक अणुबॉम्बइतकी ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. पीवादळांची निर्मिती ही थेट पृथ्वीच्या स्वतच्या अक्षाभोवती फिरण्याशी संबंधित आहे. विषुववृत्ताजवळील समुद्रात जेथे पाण्याचे तापमान 26 अंश सेल्सियस किंवा त्याहून अधिक असेल तेथे अशी पीवादळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे जेव्हा समुद्रावरील हवा तप्त होते, तेव्हा ती वेगाने वरच्या दिशेला जाते. अशा रीतीने वर जाताना हवेचा वेग वाढला की, ती खूप वेगाने फिरते आणि एक मोठे वर्तुळ बनते. हे वर्तुळ काही वेळा 2,000 किलोमीटरच्या त्रिज्येपर्यंत विस्तारू शकते.
भारतीय उपखंडात प्रत्येक वेळी वारंवार येणाऱ्या आणि प्राणघातक वादळांचे खरे कारण म्हणजे मानवाकडून निसर्गाच्या अंदाधुंद शोषणामुळे होणारे हवामान बदल होय. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने इशारा दिला आहे की, येणाऱ्या काळात वाढत्या हवामान बदलांमुळे पीवादळे अधिक धोकादायक बनतील. हवामान बदलामुळे उष्णकटिबंधीय महासागरांच्या तापमानात वाढ झाल्यामुळे चालू शतकाच्या अखेरीस तीव्र पाऊस आणि वादळांचे प्रमाण वाढू शकते. नासाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे 28 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते तेव्हा तीव्र वादळे येतात. `जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ (फेब्रुवारी, 2019) मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सियस वाढीमुळे पीवादळांची संख्या 21 टक्क्यांनी वाढते.
विकासाच्या नावाखाली निसर्गाचे शोषण करून आपण जे पर्यावरणीय असंतुलन निर्माण केले आहे ते माणसाला आणखी संकटात टाकू शकते. भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आळा घालण्यासाठी निसर्गाची सातत्याने होणारी लूट थांबवावी लागेल. जंगलांची संख्या वाढवावी लागेल. बेसुमार वृक्षतोड थांबवून वनीकरण करावे लागेल. सबंध पृथ्वी गिळंकृत करू पाहणारा प्रदूषणाचा महाराक्षस नियंत्रणात आणावा लागेल. अन्यथा भविष्यात निसर्गाचा प्रकोप आणखीच वाढत जाईल आणि त्याच्याशी सामना करणे माणसाला अशक्य होऊन जाईल.
बदलत्या काळात हवामान अंदाजांचे तंत्र अद्ययावत झाल्यामुळे पीवादळांचा पूर्वअंदाज येत आहे आणि त्यामुळे होणारी जीवितहानी कमी करता येणे शक्य झाले आहे; परंतु जागतिक तापमानवाढीमुळे या वादळांची वाढत चाललेली संख्या मोठे आर्थिक तडाखे देत आहे. तीव्र उष्णकटिबंधीय पीवादळांमध्ये एखाद्या देशाचा आर्थिक विकास दहा वर्षांहून अधिक काळासाठी मंदावण्याची ताकद असते, असे काही अभ्यासक सांगतात. मागील दशकांत पीवादळांमुळे देशात सुमारे 20.4 दशलक्ष लोक प्रभावित झाले असून 51.5 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाले आहे.
(लेखक पर्यावरण अभ्यासक आहेत)
Comments are closed.