खेळाडूनंतर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत एमएस धोनी? CSKच्या CEOचे मोठे विधान
आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे एमएस धोनीला संपूर्ण हंगामातून बाहेर राहावे लागले. त्यामुळे चाहत्यांना यंदाच्या मोसमात धोनीला पिवळ्या जर्सीत मैदानात पाहता आले नाही. त्यानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का, याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी धोनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
एका मुलाखतीत बोलताना काशी विश्वनाथन म्हणाले, “धोनी कोणत्याही भूमिकेत असला तरी तो सीएसकेसोबत कायम जोडलेला राहावा, अशी आमची इच्छा आहे. खेळाडू, प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक, कोणतीही भूमिका असो, अंतिम निर्णय मात्र धोनीचाच असेल.”
धोनीनंतर चेन्नईची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याबाबत विचारले असता विश्वनाथन म्हणाले, “ऋतुराजने तीन-चार वर्षे धोनीला जवळून पाहिले आहे. धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याला शांत आणि संयमी कर्णधार म्हणून तयार केले आहे. भविष्यात तोही चेन्नईसाठी खेळणाऱ्या युवा क्रिकेटपटूंमध्ये हे गुण विकसित करेल, असा मला विश्वास आहे.”
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. लीग टप्प्यातील 14 सामन्यांपैकी चेन्नईने फक्त 6 सामने जिंकले. 12 गुणांसह संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर राहिला.
हंगामाची सुरुवात खराब झाल्यानंतर चेन्नईने मधल्या टप्प्यात काही प्रमाणात पुनरागमन केले होते. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याचा फटका संघाला प्लेऑफच्या शर्यतीत बसला.
Comments are closed.