Nagar crime news – पत्नीबरोबरच्या वादातून पतीने स्वतःवर झाडली गोळी

पत्नीबरोबर झालेल्या किरकोळ वादातून पतीने गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली.

सोमनाथ रामभाऊ वाकचौरे (वय – 32) हा कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी आहे. सोमनाथ वाकचौरे याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने त्याची पत्नी काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे माहेरी राहत आहे. मंगळवारी सोमनाथ चिंचोली फाटा येथे आला होता. यावेळी सोमनाथचा पत्नीशी वाद झाल्याने बुधवारी सकाळी पत्नीने सोमनाथविरोधात राहुरी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पती सोमनाथ वाकचौरे याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिंचोली फाटा येथील भंडारदरा उजव्या कालव्यालगत गावठी कट्ट्यातून स्वतःच्या हनुवटीखाली गोळी झाडून घेतली.

गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सोमनाथ गंभीर जखमी झाला. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल पवार, तुळशीदास गिते, सोमनाथ जायभाय, सतीश आवारे, राहुल यादव, अंकुश भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करून जखमी सोमनाथ वाकचौरे याला लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने सोमनाथला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed.