महिलेस चाकूचा धाक दाखवून घरावर दरोडा, जामखेडजवळील घटनेने घबराट; साडेतीन लाखांचा ऐवज लुटला

शहरापासून जवळच असलेल्या साकत फाट्याजवळील एका घरातील महिलेस सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून 8 तोळे सोने व 71 हजार रुपयांची रोकड, असा एकूण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे या दरोड्यातील आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून, घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली आहे. दरोड्याच्या घटनेने जामखेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेड शहरापासून दोन कि.मी. अंतरावरील बीड रोड येथील साकत फाट्याजवळ फिर्यादी महिला प्रतीक्षा शंकर रोकडे (वय 19) ही कुटुंबासमवेत राहत आहे. मध्यरात्रीनंतर एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले. यावेळी आरोपी महिलेने प्रतीक्षा यांना आवज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले. घराचे दार उघडताच, स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरटे आत शिरले. प्रतीक्षा यांना चाकूचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम लुटली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्यावर राहत असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला.

घराला कुलूप असल्याने चोरट्यांनी दार तोडून घरातील रोख रक्कम व सोने चोरून नेले. अशाप्रकारे दोन्ही घरातील एकूण 2 लाख 51 हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने व 71 हजार 750 रुपयांची रोख असा एकूण 3 लाख 22 हजार 750 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे पथकाचे निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवलकर, वर्षा जाधव यांनी भेट दिली.

Comments are closed.