नशामुक्तीचा ‘निर्धार’; झिंग मात्र कायम! ड्रग्जमाफियांच्या कारनाम्यापुढे पोलीस हतबल
‘नशामुक्त पुणे’साठी पुणे पोलिसांकडून राबवण्यात येणारी ‘निर्धार’ मोहीम सुरू असली, तरी प्रत्यक्षात शहरात गांजा, मेफेड्रॉन, नशेच्या गोळ्या यांचा सर्रास वापर आणि खुलेआम विक्री सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून शहराच्या विविध भागांतून अशा विक्रेत्यांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मोहिमेचा कितपत प्रभाव पडतोय, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, ही आवक कमी होत नसल्याचे दिसत आहे.
‘ललित पाटील’ प्रकरणानंतर ड्रग्जविरोधात जोरात मोहीम राबवण्याचा पोलिसांचा निर्धार दिसून आला होता. शाळा, कॉलेज, हॉटस्पॉट परिसरात प्रबोधन सुरू करण्यात आले. त्यासाठी पुणे पोलिसांनी ‘नशामुक्त पुणे’साठी निर्धार मोहीम राबविली. तथापि, नुकत्याच झालेल्या कारवायांतून मेफेड्रॉन आणि गांजाचे मोठ्या प्रमाणावर विक्रेते सापडत असल्याने, ही समस्या केवळ पृष्ठभागावरच हाताळली जात आहे की काय, असे चित्र आहे.
मागील काही दिवसांत स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहराच्या विविध भागांतून मेफेड्रॉन, गांजा, नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये कोंढवा, खडकी, हडपसर तसेच शहराचा मध्यवर्ती भाग असलेला बुधवार पेठ आदी ठिकाणांचा समावेश आहे. त्यामुळे ड्रग्जचे जाळे थांबण्याऐवजी अधिक विस्तारत असल्याचे दिसते. ड्रग्जची मागणी आणि विक्री यावर प्रभावी नियंत्रण अजूनही दिसून येत नाही.
ड्रग्जविक्रेत्यांची ही साखळी तोडता आलेली नाही. गेल्या वर्षभरात पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची रक्कम कोट्यवधीची आहे. यातून ड्रग्जचे जाळे किती खोलवर रुजले आहे, हे स्पष्ट होते. शाळकरी वयातील मुलांपासून कॉलेज तरुणाई आणि नोकरदार वर्गापर्यंत नशेचे व्यसन पोहचले आहे. त्यामुळे ड्रग्जच्या मुळावर घाव घालणारी मोहीम आणि विक्रेत्यांची चैन संपविणे गरजेचे आहे.
मुलांना व्यसनातून बाहेर काढण्याचा दावा, पण…
पोलिसांनी शाळा, कॉलेज, अल्पवयीन मुलांवर लक्ष केंद्रित करून जनजागृतीसाठी विविध एनजीओंच्या मदतीने मोहीम राबविल्याचे सांगण्यात येते. परिमंडळ पाचमधील काही भागांत शाळा, महाविद्यालयांनजीक असलेल्या टफ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. मात्र, इतर भागांत अशाप्रकारे प्रभावी कारवाई झालेली नाही. तसेच अनेक भागांत परिस्थिती ‘जैसे थे’ असून, कारवाईत सातत्य नाही. त्यामुळे अवैध विक्रेत्यांचे फावत आहे.
Comments are closed.