नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकम
नाशिक नगर परिषद निवडणूक नाशिक जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे (Nashik Nagarparishad Election) मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी सलग राड्यांच्या घटना घडल्याने निवडणुकीचे वातावरण तणावपूर्ण बनले. सकाळपासून जिल्ह्यातील मनमाड, येवला, सटाणा आणि त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी गट आमनेसामने येत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Manmad Election: मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले
मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. पाहता पाहता ढकलाढकली आणि धक्काबुक्की सुरू झाली. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मतदारांची पळापळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांना वेगळे केले आणि मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
Yeola Election: येवल्यात अजित पवार गट आणि शिवसेनेत हाणामारी
येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा उसळला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवले. मतदान केंद्राबाहेर सतत तणाव निर्माण होत असल्याने पोलिस कर्मचारी सतत तैनात ठेवण्यात आले आहेत.
Satana Election: सटाण्यात मतदान केंद्राजवळ वाद
सटाणा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक 10 जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणली. राड्यातील काही सहभागी थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्याचे समजते. मतदान केंद्राजवळील एका उमेदवाराचा बूथ पोलिसांनी हटवून कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक बंदोबस्त उभा केला आहे.
Trimbakeshwar Election: त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली.
Nashik Nagarparishad Election: नाशिकमध्ये दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 46.71 टक्के मतदान
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 46.71 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वात कमी मतदान येवला तर सर्वाधिक मतदान त्र्यंबकमध्ये झाले आहे. येवल्यात दुपारी दुपारी साडे तीन वाजेपर्यंत 37.02 तर त्र्यंबकला 69.75 टक्के मतदान झाले आहे. पिंपळगाव बसवंत 57.02 टक्के, भगूर 52.43 टक्के, मनमाड 39.52 टक्के, सिन्नर 48.03 टक्के, इगतपुरी 48.73, चांदवड 53.39 टक्के, ओझर 41.टक्के, नांदगाव 40.20 टक्के आणि सटाण्यात 55.15 टक्के इतके मतदान झाले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.