महाराष्ट्रात नावी ॲपचा मोठा घोटाळा! एक रुपयात 3999 रुपयांचा रिचार्जची ऑफर, बॅलेन्स भरताच तरुण..

नवी अॅप फसवणूक: महाराष्ट्रात ‘नावी इन्स्टंट लोन ॲप’च्या माध्यमातून मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून या फसवणुकीचं केंद्रबिंदू धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गाव ठरलं आहे. मोबाईल रिचार्जच्या आकर्षक ऑफरच्या नावाखाली या ॲपकडून तरुणांवर कर्जाचा फास बसल्याचं उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ढोकी गावातील तब्बल 200-300 तरुण या ऑफरच्या जाळ्यात आले आहेत. साधारण दोन ते तीन कोटींचा घोटाळा असल्याचा अंदाज या घोटाळ्यात व्यक्त करण्यात येतोय. (Dharashiv Crime)

नक्की प्रकरण काय?

रिचार्ज ऑफरच्या नावाने आर्थिक फसवणूक झाली असून धाराशिव जिल्ह्यातील ढोकीचे 200-300 तरुण या फसवणूकीत अडकले आहेत.नावी ॲपने एक खास ऑफर आणली होती, जिच्या अंतर्गत केवळ 1 रुपयात 3999 रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जात होता. ही ऑफर ख्रिसमसच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तरुणांनी युपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले. मात्र, काही दिवसांतच त्यांच्या बँक खात्यांवर मोठी रक्कम उचलण्यात आल्याचे समोर आले.

ढोकी गावातील 200 ते 300 तरुण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. किराणा दुकानात काम करणारे, पेट्रोल पंप कर्मचारी, मजूर तसेच बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर या ॲपच्या जाळ्यात अडकले आहेत. अंदाजानुसार 2 ते 3 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बँक खात्यावर होल्ड, जबरदस्तीने वसुली सुरू

नावी ॲपने मोबाईल रिचार्जच्या नावाखाली तरुणांना मोठ्या रकमेच्या कर्जाच्या जाळ्यात ओढले आहे. आता ॲपकडून पैसे वसूल करण्याची जबरदस्ती सुरू झाली आहे. बँक खात्यावर होल्ड टाकून ही रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे तरुण बँकांकडे धाव घेत आहेत. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या व्यवहारांशी बँकेचा कोणताही संबंध नाही आणि ग्राहकांनी स्वतःहून युपीआयद्वारे व्यवहार केले आहेत.फसवणुकीच्या या प्रकारात अनेकांनी आपल्या मित्र-नातेवाईकांचे मोबाईलनंबर वापरून रिचार्ज केले. त्यामुळे आता त्यांच्या नावावरही पैसे काढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पैसे कुठून भरणार? हा मोठा प्रश्न या तरुणांसमोर उभा आहे.

राज्यभरात मोठ्या घोटाळ्याची भीती

ढोकी गावासह धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांत हा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा केवळ एका गावापुरता सीमित नसून राज्यभर अनेक जण याला बळी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या फसवणुकीबाबत अधिकृत तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रात नावी ॲपच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारींची दखल घेतली असून, लवकरच या घोटाळ्याचा तपास सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

https://www.youtube.com/watch?v=9uqqHzrcuxa

Pune Crime Swargate bus depot: बसच्या आजुबाजूला 10-15 लोक होते, पण तरुणीने स्ट्रगल केला नाही, त्यामुळे दत्तात्रय गाडेला गुन्हा करता आला: गृहराज्यमंत्री योगेश कदम

अधिक पाहा..

Comments are closed.