कार बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे
स्फोटके अन्यत्र नेताना स्फोट झाल्याचे तपासात उघड, सहा जणांना अटक, मृतांची संख्येत वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत लालकिल्ल्यानजीकच्या मेट्रो स्थानकाबाहेर सोमवारी झालेला भीषण कारस्फोट प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाकडे (एनआयए) देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही हा दहशतवादी हल्लाच असल्याचे अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेले नसले, तरी तो दहशतवादी हल्लाच आहे, असे गृहित धरुनच तपास केला जात आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारलेली नाही. या स्फोटातील मुख्य संशियाताच्या आई-वडीलांना श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराला लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून तपासाला वेग प्राप्त झाला आहे. शनिवारी आणि रविवारी पाच राज्यांमध्ये धडक कार्यवाही करुन एक दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी निसटलेला दहशतवादी काही स्फोटके कारमध्ये घालून अन्यत्र निघाला होता. पण लाल किल्ला मेट्रो स्थानकानजीक कार थांबली असताना या स्फोटकांचा स्फोट झाला आणि हा अनर्थ घडला आहे. मात्र, हा स्फोट दहशतवाद्यांच्याच कारमध्ये झाल्याने हा दहशतवादी हल्लाच असल्याचे गृहित धरुन कारवाई केली जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सर्व अन्वेषण संस्थांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. कोणत्याही परिस्थितीत या स्फोटाचे सूत्रधार सापडलेच पाहिजेत, अशी सूचना सर्व अन्वेषण प्राधिकारणांना देण्यात आलेली आहे. पुरेशा तपासानंतर पूर्ण शाश्वती झाल्यानंतरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल, असे एनआयएने आणि पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वाढली मृतांची संख्या
या हल्ल्यातील मृतांची संख्या 12 झाली आहे. गंभीर जखमींपैकी आणखी दोन जणांचा मृत्यू रुग्णालयात उपचार होत असताना झाल्याची माहिती देण्यात आली. या हल्ल्याचा थेट संबंध शनिवारी आणि रविवारी उध्वस्त करण्यात आलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी आहे, ही बाब स्पष्ट झाली आहे. हे मॉड्यूल उध्वस्त करण्यात येत असताना निसटलेल्या एका दहशतवाद्याने घाईगडबडीने हा स्फोट घडवून आणला. ज्या कारमध्ये स्फोट झाला, ती हरियाणातील फरिदाबातचीच असल्याचे स्पष्ट झाले असून याच शहरात दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त करण्यात आले होते. त्यावेळी 3,000 किलो उच्च दर्जाची स्फोटके जप्त केली गेली होती.
मोहम्मद उमर सूत्रधार डॉ
या कार स्फोटाचा सूत्रधार काश्मीरमधील डॉ. मोहम्मद उमर हा असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा शोध घेतला जात आहे. त्याच्या आईवडिलांना अटक करण्यात आली. आणखी चार डॉक्टर्सनाही अटक करण्यात आली असून या दहशतवादी रॅकेटची पाळेमुळे किमान पाच राज्यांमध्ये पसरली असल्याचे दिसून आले आहे. अन्य राज्यांमध्येही दहशवाद्यांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आत्मघाती हल्ला
दिल्लीत सोमवारी झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असेलच तर तो फियादिन किंवा आत्मघाती स्वरुपाचा आहे. स्फोट घडलेल्या कारच्या चालकाचाही या स्फोटात मृत्यू झाला असून कारमधील आणखी दोघे ठार झाले आहेत. मात्र, त्याची ओळख पटेपर्यंत त्याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारमध्ये स्फोटके होती, हे आतापर्यंतच्या तपासातून निश्चित झाले आहे. स्फोट झालेल्या स्थानी हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना नसावी. ते अन्यत्र स्फोटके घेऊन जात असताना स्फोट झाला, असे दिसून येते. एनआयए या सर्व शक्यतांचा कसून तपास करत असून येत्या एक दोन दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असे अन्वेषण संस्थांचे म्हणणे आहे. म्हणून आत्ताच त्याच्यासंबंधीचा अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
रुग्णालयात नातेवाईकांची व्यवस्था
सर्व जखमींना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. उपचारांवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी केली असून आपल्या जखमी कुटुंबियांची माहिती ते घेत आहेत. काही जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध त्यांचे नातेवाईक रुग्णालयात घेत असल्याचे दिसून आले. रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांना महिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून अतिरिक्त कर्मचारी नियुक्त आहेत.
दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडेकोट
दिल्लीत सर्व महत्वाच्या आस्थापनांवर सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. महत्वाच्या मंदिरांनाही सुरक्षा पुरविण्यात येत आहे. जम्मू शहरातही माता वैष्णोदेवी मंदिरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. काश्मीरमधील महत्वाच्या आस्थापनांना अधिक सुरक्षा देण्यात आली. केंद्रीय सुरक्षा दलांच्या अनेक तुकड्या संवेदनशील स्थानी नियुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सर्व संशयित पुलवामाचे
दिल्लीच्या या भीषण स्फोटाचा थेट संबंध जम्मू-काश्मीरमधील पुलवामाशी जोडण्याइतका पुरावा जमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारचा चालक आणि स्फोट घडवून आणणारा डॉ. मोहम्मद उमर हे पुलवामाचेच आहेत. तसेच, स्फोटासाठी उपयोगात आणलेली कारही मूळची पुलवामाचीच आहे. हे स्पष्ट झाले आहे. मोहम्मद उमर याच्या नातेवाईकांची चौकशी केली जात असून तो असे काही करेल, असे आम्हाला वाटलेही नाही, अशी माहिती काही नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मोहम्मद उमर याच्या चार सहकारी डॉक्टरांना रविवारी अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्यानेच त्याच्यापाशी असलेल्या स्फोटाकांचा उपयोग करुन हा स्फोट केल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्याच्या सहकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
अमोनियम नायट्रेटचा उपयोग
हा स्फोट अमोनियम नायट्रेट या रासायनिक द्रव्याचा होता. डीटोनेटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचे पुरावेही सापडले आहेत. ज्या पद्धतीने आणि ज्या प्रकारे हा स्फोट झाला, त्यावरुन याच स्थानी हल्ला करण्याची दहशतवाद्यांची योजना नसावी, असे आतापर्यंतच्या तपासावरुन आढळत आहे, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून प्राप्त झाल्याने अद्यापही स्फोटाचे गूढ कायम आहे.
मॉड्यूल उध्वस्त केले नसते तर…
गेल्या शनिवारी आणि रविवारी दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमधील पोलिसांनी एक मोठे दहशतवादी मॉड्यूल उध्वस्त केले होते. 3 हजार किलो स्फोटके हस्तगत करण्यात आली होती आणि सहा जणांना अटकही करण्यात आली होती. हे मॉड्यूल उध्वस्त झाले नसते, तर येत्या काही दिवसांमध्ये साऱ्या देशभरात भीषण स्फोट मालिका घडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव यशस्वी झाला असता. तथापि, या पाच राज्यांमधील पोलिसांनी वेळीच संयुक्त कारवाई केल्याने फार मोठा संभाव्य अनर्थ टळला आहे. मात्र, एका निसटलेल्या दहशतवाद्याने दिल्ली स्फोट घडवून आणून 12 जणांचा बळी घेतला.
दिल्लीत धाडसत्र
सोमवारी मध्यरात्रीपासूनच दिल्लीत अनेक संशयित स्थानी धाडसत्राचा प्रारंभ करण्यात आला होता. सर्वसामान्य नागरीकांनाही सावध करण्यात आले होते. दिल्लीच्या विविध भागांमधून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीसह नोयडामध्येही मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे पोलिस नोयडा येथे तपास करीत आहेत. त्यांनीही दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दिल्लीत सोमवारी रात्रीपासून किमान आठ स्थानी धाडी घालून काही पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
3 तास कारमध्येच…
आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झालेली महत्वाची बाब म्हणजे स्फोट झालेली कार मेट्रो स्थानकाच्या पार्किंगमध्ये सोमवारी दुपारी 3 वाजून 18 मिनिटांपासून 6 वाजून 22 मिनिटांपर्यंत होती, या काळात मोहम्मद उभर हा या कारमध्येच बसून होता, असे सीसीटीव्ही फूटेजमधून दिसून आले आहे. त्यानंतर काही काळ तो बाहेर गेला. नंतर परत आला आणि त्यानंतर काही वेळातच कारमध्ये स्फोट झाला. त्याला याच स्थानी स्फोट करायचा होता, की स्फोटके अन्यत्र न्यायची होती, हे स्पष्ट झालेले नाही. या संबंधी एनआयएकडून कसून चौकशी केली जात आहे.
प्राथमिक अहवाल सादर
दिल्ली स्फोटाच्या अन्वेषणाचा प्राथमिक अहवाल दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहविभागाला सोपविला आहे. या अहवालात या स्फोटाचा घटनाक्रम आणि संभाव्या कारणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच स्फोट घडल्यापासून नंतरच्या 18 तासांमध्ये जो तपास करण्यात आला आहे, त्याची सविस्तर माहिती या अहवालात आहे. मात्र, या अहवालात घटनेसंबंधी निश्चित निष्कर्ष काढण्यात आलेला नाही, अशीही माहिती सूत्रांनी मंगळवारी संध्याकाळी दिली आहे.
अनेक शहरांना अतिदक्षतेची सूचना
दिल्ली स्फोटाचा तपास होत असतानाच देशातील सर्व प्रमुख शहरे आणि सरकारी आस्थापनांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनौ, चंदीगढ, पुणे, नागपूर, हैद्राबाद, पाटणा, गांधीनगर, सुरत, भोपाळ, जयपूर, भुवनेश्वर, बेंगळूर आदी शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि मंदिरांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा दलांना सतर्कतेची सूचना देण्यात आली असून, त्यांच्या तुकड्या अनेक स्थानी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाने दिली आहे. भारताच्या सीमेवरही सैन्यदलांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
एनआयएचे अधिकारी घटनास्थळी
या स्फोटाचा तपास हाती घेतल्यानंतर एनआयएच्या चार महत्वाच्या अधिकाऱ्यांनी स्फोट घडला त्या स्थानी प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात संचारबंदी घोषित करण्यात आली असून एनआयएने सारा परिसर आपल्या हाती घेतला आहे. घटनास्थळावरुन पुरावे संकलित करण्यात येत असून स्फोटकांचे स्वरुप कोणते होते, यासंबंधी तपास केला जात आहे. तसेच या स्फोटाचा आंतरराष्ट्रीय संबंध आहे काय, याचेही अन्वेषण करण्यात येत आहे.
जगभरातून प्रतिक्रिया
या स्फोट घटनेवर भारतासह जगभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या सर्वांनी या घटनेचा निषेध केला असून दहशतवादाला नागरी समाजात कोणतेही स्थान नसून दहशतवाद्यांच्या कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. दहशतवादाविरोधात एकजूट राखणे आवश्यक आहे, असेही प्रतिपादन केले गेले.
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या कोणालाही या देशात स्थान नाही. दिल्लीतील स्फोट घटना अत्यंत भीषण असून केंद्र सरकारने ती अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. वेगाने चौकशी केली जात असून लवकरच, सत्य समोर येणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भारतात घडलेली घटना गंभीर आहे. मात्र, अद्याप हा दहशतवादी हल्लाच आहे किंवा नाही, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या संबंधातील चित्र लवकरच स्पष्ट होईल आणि योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी आमची अपेक्षा आहे.
अमेरिकेचा भारतातील राजदूतावास
भारतातील ही स्फोट घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेमागचे सत्य लवकरच बाहेर येईल आणि घटनेला उत्तरादायी असणाऱ्यांवर योग्य ती करावाई केली जाईल. आम्ही भूतानचे नागरीक मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो, अशी प्रार्थना करतो.
नरेशचे जिग्मे खिर्स नागचुक
दिल्लीतील कारस्फोट घटनेत ज्या नागरीकांनी प्राण गमावले आहेत, त्यांना आम्ही दु:खी अंत:करणाने श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. आमची सहानुभूती त्यांच्यासमवेत आहे
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई
ही घटना गंभीर आहे. हा हल्ला चिंताजनक आहे. तो केवळ काही व्यक्तींवर झालेला हल्ला नाही तर साऱ्या मानवतेवरचा तो आघात आहे. हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सारे नागरीक सहभागी आहोत.
काँग्रेस खासदार तारिक अन्वर
Comments are closed.