आता दागिन्यांवरही दंड
सोने, चांदी, हिरे, मोती आदी मौल्यवान वस्तूंपासून बनविलेली आभूषणे (दागिने) महिलांना प्राणप्रिय असतात ही बाब जगजाहीर आहे. तथापि, उत्तराखंड राज्यातील एका ग्रामपंचायतीने आभूषणप्रिय महिलांना संताप येईल, असा एक नियम केला आहे. महिलांनी घराबाहेर पडताना तीन पेक्षा अधिक आभूषणे किंवा दागिने परिधान केल्यास त्यांना दंड करण्यात येईल, असा हा नियम आहे. हा दंडही थोडाथोडका नव्हे, तर चांगला 50 हजार रुपयांचा आहे.
उत्तराखंड राज्याच्या देहराडून जिल्ह्यातील जौनसार बाबर विभागातील कंदार आणि इंद्रौली नामक ग्रामांच्या ग्रामपंचायतींनी हा नियम केला आहे. या नियमानुसार यापुढे कोणत्याही महिलेला विवाह किंवा अन्य कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, तर तिने अंगावर जास्तीतजास्त 3 दागिने घातले पाहिजेत. त्यापेक्षा अधिक आभूषणे असतील, तर 50 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. असा नियम का करण्यात आला, याचे कारण ग्रामपंचायतींनी स्पष्ट केलेले नाही. तथापि, महिलांच्या सुरक्षेसाठी हा नियम करण्यात आल्याचे अनधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन महिलांनी सार्वजनिक स्थानी करु नये, हा हेतूही असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तथापि, महिलांनी या नियमाला विरोध केला असून हा नियम आपल्या व्यक्तीस्वातंत्र्याला बाधा पोहचविणारा आहे, असा आक्षेप घेतला आहे. महिलांनी आपला खर्च कमी करावा, म्हणून हा नियम करण्यात आला असेल, तर पुरुषांनाही मद्यपान आणि पैशाची उधळपट्टी करुन चैन करण्यावर बंदी घातली जावी, अशी महिलांची रास्त मागणी आहे. अधिक दागिने घातल्याने तसे पाहिल्यास कोणतीही शारिरीक हानी होत नाही. अतिमद्यपान किंवा अन्य ‘पुरुषी’ व्यवसांमुळे मात्र अशी हानी होते. त्यामुळे ही व्यसने आभूषणांच्या आवडीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात घातक असतात. पण त्यांच्यावर कोणतीही बंधने घातली जात नाहीत, यावर महिलांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिलांचा हा विरोध ग्रामपंचायतीला तिचा हा विचित्र नियम मागे घेण्यास भाग पाडण्यात यशस्वी होतो तो का नाही, हे काही काळाने समजणार आहे.
Comments are closed.