शंभू सीमा उघडा

पंजाबच्या उद्योजकांची मुख्यमंत्री मान यांच्याकडे मागणी

वृत्तसंस्था/ जालंधर

पंजाब विधानसभेत कॅबिनेट मंत्री अमन अरोडा यांच्याकडून शंभू बॉर्डर खुली करण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर जालंधरच्या उद्योजकांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासमोर हा मुद्दा मांडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्योजकांनी शंभू बॉर्डर बंद असल्याने उद्योग अन् व्यापारावर होत असलेल्या परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या मागण्यांचे निवेदन सोपविले आहे.

पंजाब भौगोलिक स्वरुपात जमिनी सीमांशी जोडलेले राज्य आहे आणि शेतकरी आंदोलनामुळे शंभू बॉर्डरवरील वाहतूक ठप्प असल्याने व्यापारी हालचाली मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहेत असे उद्योजकांनी म्हटले आहे. शिष्टमंडळाने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

हितांचे रक्षण करू

राज्य सरकार उद्योजकांसमोर उदभवलेल्या समस्यांवर उपाययोजना करत त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. राज्य सरकार पंजाबमध्ये उद्योग अन् व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने उद्योगांच्या सुविधेसाठी यापूर्वीच अनेक पुढाकार सुरू केले आहेत. उद्योजकांना सामारे जावे लागत असलेल्या मुद्यांना केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारसमोर वैयक्तिक स्वरुपात उपस्थित करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मान यांनी दिले आहे.

सरकारकडून प्रोत्साहन

कंपन्या स्वत:च्या व्यवसायाच्या विस्तारासाठी राज्यात उत्कृष्ट मूलभूत सुविधा, वीज, कुशल मनुष्यबळ आणि उत्तम औद्योगिक तसेच कार्यसंस्कृतीयुक्त अनुकूल वातावरणाचा अधिकाधिक लाभ उचलत असल्याचे पाहून आनंद होतो. पंजाब सरकार राज्यात औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना मदत करणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे. या शिष्टमंडळात पंजाबमधील आघाडीचे उद्योजक सामील होते.

Comments are closed.