जमिनीवर विमान, प्रवासी वाट पाहत!
इंडिगोची सेवा अजूनही कोलमडलेलीच : विमानतळांवर प्रवाशांचा संताप अनावर मारहाण : 3 लाख प्रवाशांना फटका
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या कामकाजात शनिवारी सलग पाचव्या दिवशी सुधारणा होण्याची चिन्हे दिसली नाहीत. रात्रभर दिल्ली, मुंबई, बेंगळूर आणि चेन्नई विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. मागील चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त झाली असून त्याचा थेट परिणाम जवळजवळ 3 लाखांहून अधिक प्रवाशांवर झाला आहे. इंडिगो विमान कंपनीला नव्या नियमांना अनुसरून क्रू कमतरतेचा सामना करावा लागल्यामुळे देशभरात अनेक विमाने जमिनीवर असून हजारो प्रवासी वेटिंगवर आहेत.
कर्मचारी कमतरतेचा सामना करणाऱ्या इंडिगोने उ•ाणे रद्द झाल्यामुळे सलग पाचव्या दिवशी संकट अधिकच तीव्र झाले आहे. देशाच्या विविध भागात विमानतळांवर गोंधळाची स्थिती असून अनेक ठिकाणी त्रस्त प्रवाशांनी प्रशासनाशी हुज्जत घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच विमानतळावर सुटकेसचे ढीग साचले असून गेल्या तीन-चार दिवसांपासून लोकांना त्यांचे सामानही मिळत नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
विमानांच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी रात्र जमिनीवर काढली. बेंगळूर विमानतळावर विमान रद्द झाल्यामुळे प्रवासी रडताना दिसले. दरम्यान, लखनऊ विमानतळावर प्रवाशांमध्ये रांगेत उभे राहण्यावरून भांडण झाले. दिल्ली विमानतळावर विमानांच्या विलंबामुळे संतप्त झालेल्या एका विदेशी महिलेने तिकीट काऊंटरवर चढत अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला असून सदर महिला प्रचंड संतापलेली दिसत आहे.
विमान प्रवाशांच्या दिमतीला रेल्वेची धाव
इंडिगोला आपली सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी किमात आठ ते दहा दिवसांचा विलंब लागणार आहे. गेल्या चार दिवसांत दररोज सरासरी 500 उड्डाणे उशिरा होत आहेत. ही संख्या शनिवार आणि रविवारी 600 पर्यंत वाढू शकतात. शनिवार आणि रविवारी हे सुट्टीचे वार असल्याने इतर दिवसांपेक्षा एक तृतीयांश जास्त उ•ाणे होतात. आता विमान वाहतूक सामान्य होण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त दिवस लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचदरम्यान आता रेल्वेने 37 प्रीमियम गाड्यांमध्ये 116 अतिरिक्त कोच जोडत प्रवाशांच्या सेवेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. इंडिगोमध्ये जास्त प्रवासी वाहतूक असलेल्या मार्गांवर ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. रेल्वेच्या या सेवेचा दररोज 35,000 प्रवाशांना फायदा होईल, असे सांगण्यात आले.
स्पाईसजेटकडून अतिरिक्त फेऱ्या
स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील 2-3 दिवसांत 100 अतिरिक्त उ•ाणे चालवली जातील जेणेकरून बाधित प्रवाशांना मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इतर विमान कंपन्यांनी भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना पर्यायी उ•ाणांच्या शोधात सामान्य किमतीपेक्षा 10 पट जास्त तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. नवीन डीजीसीए नियम लागू केल्यामुळे इंडिगोमध्ये सक्रीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली. परिणामत: आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नवे नियम तात्पुरते स्थगित केले आहेत.
प्रवाशांमध्ये वाढत रोष
विमानसेवा कोलमडल्यामुळे दिल्ली विमानतळावर सुटकेसचे ढीग दिसून येत होते. तसेच अनेक प्रवासी जमिनीवर झोपलेले दिसले. अनेकांनी 12-14 तासांपर्यंत अन्न-पाणी मिळाले नसल्याची तक्रारही केली आहे. हैदराबाद, गोवा आणि चेन्नई विमानतळांवरही प्रवाशांचा रोष उफाळून आला.
इंडिगोने पुन्हा माफी मागितली
परिस्थिती सुधारण्यासाठी एअरलाईन्सची टीम डीजीसीए, नागरी उड्डाण मंत्रालय आणि विमानतळ प्राधिकरणांसोबत ब् ााsलणी सुरू असल्याचे एअरलाइनने सांगत पुन्हा एकदा माफी मागितली आहे. नवीन नियमांनुसार पायलट आवश्यकतांची चुकीची गणना केल्याची कबुली एअरलाइनने दिली आहे. नवीन एफडीटीएल नियमांमध्ये रात्रीच्या ड्युटीचे तास वाढवणे आणि आठवड्याच्या विश्रांतीचा कालावधी वाढवणे समाविष्ट होते. आता, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नियम तात्पुरते स्थगित केले असले तरी पायलट युनियन संतप्त झाली आहे.
वेगवेगळ्या विमानतळांवरील स्थिती…
► बेंगळूर : विमानतळावर क्रूच्या कमतरतेमुळे अनेक विमाने ग्राउंड करण्यात आली होती. तसेच विमानतळ प्रवाशांनी खचाखच भरलेले होते.
► नवी दिल्ली : येथील विमानतळावर प्रवासी मोठ्या क्रीनवर चेक-इन माहिती तपासताना दिसले. येथे विमानतळावर लांबलचक रांगा दिसल्या.
► मुंबई : येथे क्रू मेंबर्सनी प्रवाशांची समजूत घातली तरीही प्रवासी नाराज दिसले. येथून दुपारपर्यंत 109 इंडिगो विमाने रद्द करण्यात आली होती.
► लखनौ : शनिवारी दुपारपर्यंत येथील 7 इंडिगो विमाने रद्द करण्यात आली आहेत. तसेच प्रवाशांमध्ये रांगेत उभे राहण्यावरून वाद झाला.
► अहमदाबाद : उ•ाणे रद्द झाल्यामुळे आणि विलंब झाल्यामुळे प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
Comments are closed.