भारतीय खेळाडूंना जेवण 2 तास उशिरा मिळणार? नेमका काय आहे नवा नियम, जाणून घ्या सविस्तर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Test series IND vs SA) पहिला कसोटी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानात खेळला जात आहे. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीतील असम क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. या कसोटीसाठी एका नियमामध्ये बदल केला आहे. जिथे खेळाडूंना सकाळी 11:30 वाजता लंच मिळत असे, आता ते जवळपास 2 तास उशिरा मिळणार आहे.

कसोटी क्रिकेट हा 5 दिवसांचा प्रकार असतो. प्रत्येक दिवशी 3 सेशन खेळले जातात. साधारणपणे एका सेशनमध्ये 25-30 षटके टाकले जातात. पहिल्या सेशननंतर 40 मिनिटांचा लंच ब्रेक असतो. दुसऱ्या सेशननंतर 20 मिनिटांचा टी-ब्रेक असतो. पण गुवाहाटीतील कसोटीत ही क्रमवारी बदलणार आहे.

खेळाडूंना लंच 2 तास उशिरा का मिळणार? कारण, गुवाहाटीमध्ये लंचच्या आधी टी-ब्रेक ठेवला आहे. भारतात कसोटी सामने साधारणपणे सकाळी 9:30 वाजता सुरू होतात, पण हा दुसरा कसोटी सकाळी 9 वाजता सुरू होईल.

सकाळी 11 वाजता टी-ब्रेक असेल, जे सामान्यतः लंचची वेळ असते. दुसऱ्या सेशननंतर जो टी-ब्रेक असतो, तिथे गुवाहाटीत लंच ब्रेक असेल. दुपारी 1:20 ते 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक असेल आणि तिसरे सेशन संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल.

भारतामध्ये एकच टाइम झोन आहे. पण देशाच्या ईशान्य भागात असलेल्या गुवाहाटीत सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. सध्या तिथे सकाळी 5:30 ला सूर्य उगवतो आणि सायंकाळी 4:30 ला मावळतो. याच कारणामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचे टाइमिंग बदलण्यात आले आहे. सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि टॉस 8:30 वाजता घेतला जाईल.

बरसापारा (ACA) स्टेडियम हे भारताचे 30वे मैदान ठरणार आहे, जिथे कसोटी सामना खेळला जाईल. याआधी येथे कधीही कसोटी सामना झाला नव्हता. या मैदानावर 2017 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता.

Comments are closed.