पंतप्रधान जॉर्डन, ओमानला भेट देणार

पश्चिम आशियातील देशांसोबत संबंध वृद्धींगत करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालू महिन्यात ओमान आणि जॉर्डनच्या दौऱ्यावर जाऊ शकतात. भारत सातत्याने पश्चिम आशियाई देशांसोबतचे स्वत:चे संबंध मजबूत करु पाहत असून अरब देशांसोबत थेट संपर्काच्या विस्ताराच्या दिशेनेही काम केले जात आहे. आगामी एक-दोन महिन्यांमध्ये यासंबंधी अनेक प्रकारचे पुढाकार घेतले जाणार आहेत. ओमानसोबत भारत अनेक महिन्यांपासून सीईपीएवर चर्चा करत असून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान यावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियाई देशांसोबतचे संबंध वृद्धींगत करण्याच्या योजनेच्या अंतर्गत सध्या भारत अनेक प्रकारचे पुढाकार घेत आहे. यानुसार पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारत अरब देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत एक मोठी बैठक आयोजित करण्याची तयारी करत आहे.

सीरियाचे विदेशमंत्री भारतात येणार

जानेवारी महिन्यात होणाऱ्या या बैठकीत सीरियाचे विदेशमंत्री असद अल-शैबानीही सामील होणार आहेत. चालू वर्षाच्या प्रारंभी विदेश मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शैबानी यांची भेट घेतली होती आणि भारताने सीरियाला मानवीय सहाय्य पाठविले होते. सीरियामध्ये सत्तापरिवर्तन झाल्यावरही नव्या व्यवस्थेमध्ये परस्पर संबंधांना नवी ऊर्जा देण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.

अरब लीगची महाबैठक

जानेवारीत भारतात आयोजित होणारी बैठक ही भारत-अरब लीग सहकार्याच्या अंतर्गत पार पडणार आहे. विदेश मंत्रालयाकडून या बैठकीत सामील होण्यासाठी अरब राष्ट्रांना निमंत्रण देण्याची प्रक्रिया जारी आहे. अशास्थितीत या बैठकीपूर्वी भारताकडून अरब देशांमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय दौऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि ओमानदरम्यान कॉप्रिहेंसिव्ह इकोनॉमिक पार्टनरशिप अॅग्रिमेंट (सीईपीए)वर स्वाक्षरी होऊ शकते. दोन्ही देश या दिशेने मागील काही महिन्यांपासून चर्चा करत आहेत.

 

Comments are closed.