भांडण थांबवून हॉटेलबाहेर जायला सांगितलं, रागाच्या भरात हॉटेल चालकाला जाळण्याचा प्रयत्न अन्…,

पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे. क्षुल्लक कारणास्तव मारहाण, दहशत पसरवण्यासाठी हातात कोयता घेऊन फिरणं, गाड्या फोडणं,  मारहाण करणं, अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. अशातच कात्रज भारती विद्यापीठ परिसरामध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून एकाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंगावर बाटलीतील पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ परिसरात एका हॉटेलच्या बाहेर पंधरा-वीस तरुणांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली होती. त्यावेळी हॉटेल चालकाने हॉटेलच्या बाहेर जाऊन भांडण करा हॉटेलमध्ये भांडण करू नका असं सांगत असताना जमलेल्या  टोळक्यांकडून, गुंडांकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. इतक्यावरच न थांबता काही वेळाने हॉटेल चालक ससून रुग्णालयात मेडिकलसाठी जात असताना त्याला रस्त्यातच अडून त्याच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हॉटेल चालक व त्याचा मित्र तिथून पळाला. मात्र गाडीवर या गुन्हेगारी टोळीकडून पेट्रोल टाकून गाडी पेटवून देण्यात आली. आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक सर्व घटना पाहत होते, परंतु कोणाचीही हिंमत पुढे जाण्याची झाली नाही, टोळक्याकडून परिसरात भीतीचे वातावरण, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

संबंधित प्रकरणी हॉटेल चालक अमित खैरे यांनी माहिती देताना सांगितले की, हॉटेलमध्ये काही टोळके एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा वाद विकोपाला जाणार होता. हे लक्षात आल्यावर त्यांना बाहेर थांबण्याची विनंती केली. त्यावेळी हॉटेलमध्ये नुकसान होऊ नये यासाठी मी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली, परंतु त्यांनी मला घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मी त्यांना विनंती करत असताना काही गुंडांनी मलाच मारण्याचा प्रयत्न केला.मला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर मी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तात्काळ फोन करून कळवले असता त्यांनी मला ससून रुग्णालय येथे  मेडिकल करण्यासाठी जाण्यास सांगितले. मी मेडिकल करण्यासाठी जात असताना माझ्या रस्त्यात मला अडवले व आमच्या विरोधात तू गुन्हा दाखल करतो का? तुला आमची दहशत माहित नाही का? आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे बोलून त्यांनी माझ्या अंगावर पेट्रोलने भरलेली बाटली फेकली मी व माझा मित्र आमच्या अंगावर पूर्णपणे पेट्रोल पडले होते. त्यातच त्यांच्यातील एकाने माचिसची एक काडी पेटून आमच्या अंगावर फेकली. ती चुकून आम्ही रस्त्याने गाडी रस्त्यात टाकून पळत सुटलो. गाडी सोडून आम्ही तेथून पळालो परंतु त्यांनी आमच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी पूर्णपणे जाळून टाकली, अशी फिर्याद अमित खैरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी घटनेनंतर व्यक्त केला संताप

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सोशल मिडियावरती संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. “पुणे शहरात आजकाल गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे. कात्रज परिसरात एका व्यक्तीला अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या घटनेपूर्वी सदर व्यक्तीला एका टोळक्याने मारहाण केली होती. याबाबत पोलीसांना कळविले होते. तेथे पोलीस वेळेत पोहोचले असते तर पुढील घटना टळली असती. कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भाने गृहखात्याची यंत्रणा किती निष्काळजी आहे याचे हे उदाहरण आहे . माझी गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावे”, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.