पुण्यात नवले ब्रिजवर भीषण अपघात; कंटेनरने 12 गाड्या उडवल्या… तीन कार पेटल्या, 8 जणांचा होरपळून मृत्यू

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त होऊन नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला. या कंटेनरने 12 वाहनांना धडक दिल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला आणि तीन कार खाक झाल्या. त्यात 8 जण होरपळले तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले. मृतांमध्ये चार पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. हा अपघात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सेल्फी पॉइंटजवळ झाला. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांसह सिंहगड रस्ता पोलीस, वाहतूक पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱयाहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे त्याने पुढील वाहनांना धडक देण्यास सुरुवात केली. जवळपास छोटय़ा-मोठय़ा मिळून 13 वाहनांना कंटेनरने उडवल्यामुळे वाहनांना आग लागली. दोन कंटेनरच्या धडकेत मोटार चेपली गेल्यामुळे त्यातील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, कंटेनरसह इतर वाहनांतील मिळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱया वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली. तसेच साताऱयाहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेन वाहतूक पोलिसांनी दोन तासांसाठी बंद ठेवली होती.

मदतीसाठी याचना… भयावह स्थिती

कंटेनर चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे आग लागली. त्यातच काही चालकांसह प्रवासी गाडीतच अडकल्यामुळे ते मदतीसाठी याचना करीत होते. मात्र, आगीचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरल्यामुळे कुणालाच त्यांच्या मदतीला जाता येत नव्हते. अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांतील प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी भयावह स्थिती होती.

चालकाने मद्यप्राशन केले की नियंत्रण सुटले?

अपघात करणाऱ्या कंटेनरचालकाने मद्यप्राशन केले होते की त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले? हे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱयांनी भेट देऊन मदतकार्य सुरू केले.

असा घडला अपघात

नवले पुलावरील अपघाताची वर्दी गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. त्यानुसार 8 अग्निशमन वाहने रवाना झाली. घटनास्थळी दोन कंटेनर आणि त्यामध्ये चारचाकी वाहन अडकल्याने पेट घेतला होता. अनियंत्रित कंटेनरने सीएनजी कार व ट्रव्हल्सलला धडक दिली. कार समोर दोन कंटेनरमध्ये अडकली आणि कारमधील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर आजूबाजूच्या गाडय़ाही पेटल्या. त्यामध्येही अनेकजण जखमी झाले आहेत.

मृतांची नावे

स्वाती संतोष नवलकर (37), शांता दत्तात्रय दाभाडे (54), दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (58), मोक्षिता हेमकुमार रेड्डी (3), कारचालक धनंजय कुमार कोळी (30), रोहित ज्ञानेश्वर कदम (25) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोघांची ओळख पटू शकली नाही.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.

Comments are closed.