मालेवार – नायरची द्विशतकी झुंज, निराशाजनक प्रारंभानंतरही विदर्भ 4 बाद 254

पहिले रणजी जेतेपद जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपल्या दैवासह मैदानात उतरलेल्या देवभूमी केरळने टॉस जिंकला. मग विदर्भची 3 बाद 24 अशी केविलवाणी अवस्था करत रणजी करंडकाच्या अंतिम लढतीची भन्नाट सुरुवात केली. पण निराशाजनक प्रारंभानंतर दानिश मालेवार आणि करुण नायरने तब्बल दोन सत्रं केरळच्या गोलंदाजांना झुंजवले आणि 215 धावांची खणखणीत भागी रचत पहिल्या दिवसावर विदर्भाचे वर्चस्व राखण्याची किमया साधली. नायरची खेळी 86 धावांवर धावचीत झाली असली तरी दानिश मालेवार 138 धावांवर खेळत आहे.
आज जामठावर रंगणाऱया लढतीसाठी दोन्ही संघांनी गेले दोन दिवस जोरदार सराव केलेला. त्यामुळे खेळपट्टीचा रागरंग काय असेल याची कल्पना होती. त्यानुसार केरळच्या सचिन बेबीने टॉस जिंकून डोळे झाकून विदर्भला फलंदाजीला उतरवले. जामठाची खेळपट्टी पहिल्या सत्रात चमत्कार दाखवणार, याचा विश्वास असल्यामुळे बेबीने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय परफेक्ट असल्याचे निधीशने आपल्या दुसऱयाच चेंडूवर दाखवून दिले. त्यानंतर पुढच्या तासाभरात जे घडले त्याची कल्पना विदर्भला नव्हती.
पहिला तास धोक्याचा
निधीकाने पार्थ रेखाडेला पायचीत करून मिळवलेल्या यशामुळे विदर्भाचा पायाखालची जमीनच सरकली. जोरदार सलामी देण्याचे पार्थ आणि ध्रुव हिरीचे ध्येय होते, पण पहिल्याच षटकात त्या ध्येयाचा फडशा उडाल्यामुळे विदर्भ हादरली, तर केरळच्या संघात आनंदाचे वातावरण पसरले, त्यानंतर शौरी आणि नालकांडेने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बॅटमधून धावाच निघत नव्हत्या. त्यातच निधीशने नालकांडेलाही बासिलच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. हे डावातील सातवेच षटक होते. फक्त अर्ध्या तासाचाच खेळ झाला होता. पुढे शौरी आणि दानिश मालेवारने आणखी अर्धा तास खेळ केला आणि मग एडन अॅपलने शौरीची विकेट टिपत तासाभरात विदर्भला तिसरा धक्का दिला. 3 बाद 24 अशा अवस्थेनंतर पहिल्या सत्रावर केरळने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढच्या तासाभरात त्यांना विदर्भला आणखी धक्के देण्याची संधी लाभली होती, पण मालेवार-नायरने केरळला ते यश मिळू दिले नाही.
मालेवार-नायरचा जिगरी खेळ
पंचविशातच आघाडीचे तीन खंदे फलंदाज माघारी परतल्यामुळे विदर्भच्या चेहऱयावर निराशा दिसत होती. केरळ जोशात होता. तेव्हा मालेवार आणि नायरने आधी संघाची पडझड रोखली. उर्वरित तासाभराचा खेळ खेळून काढला. एक तास खेळल्यानंतर दोघांचा आत्मविश्वास दुणावला आणि दोघांनी धावाही काढण्यास सुरुवात केली. दोघांची चेंडूंवर अशी नजर बसली की, त्यांनी दुसरे सत्रही खेळून काढत चक्क दीडशतकी भागी केली. गेल्या दोन्ही सामन्यांत 79 आणि 75 धावांची खेळी करणाऱया दानिशने मोसमातील आपले दुसरे शतक साजरे केले. दुसरीकडे चार शतकांचा पाऊस पाडणाऱया करुण नायरलाही आणखी एका शतकाची संधी होती. दोघांचा खेळ पाहता तिसरे सत्रही हे दोघेच खेळून काढणार असे स्पष्ट संकेत होते. मात्र दिवसाचा खेळ संपायला अवघी 20 मिनिटे असताना नायर धावचीत झाला आणि तब्बल पाच तासांची ही 215 धावांची भागी फुटली. नायरने 188 चेंडूंत 86 धावा केल्या. पहिला तास गाजवणाऱ्या केरळला पुढील पाच तास मालेवार नायरने झुंजवत पहिला दिवस विदर्भच्या नावावर केला.
Comments are closed.