रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार
रत्नागीरी गुन्हा: रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील उन्हवरे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याने गावात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचं नाव विनोद गणपत तांबे असून, आरोपी मोठा भाऊ रवींद्र तांबे याला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघा भावांमध्ये वाद झाला. घरगुती कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका चिघळला की रवींद्रने हातातील धारदार कुऱ्हाड उचलून थेट विनोदवर सपासप वार केले. या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
नेमकं घडलं काय?
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतदेह ताब्यात घेऊन दापोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी रवींद्र तांबे याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघेही बंधू एका घरात राहायचे. काही दिवसांपासून त्यांच्यात घरातील मालमत्तेवरून वाद सुरु होता. शनिवारी रात्री त्याच वादातून रवींद्रचा ताबा सुटला. वाद टोकाला गेला अन् त्याने सुटले आणि त्याने खून केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या दोन्ही भावांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि भांडण होत होते.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली सुरू आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं असून, ठोस पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांमध्ये इतका गंभीर वाद होऊन त्याचा शेवट थेट खुनात झाला असल्याने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे ही घटना गावकऱ्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. गावात सर्वत्र या धक्कादायक घटनेचीच चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.