“सगळी टीम अशीच खेळते”, पंतचे आफ्रिकन फलंदाजांवर तिखट वक्तव्य; VIDEO VIRAL
टीम इंडियाचा तडफदार विकेटकीपर ऋषभ पंत आपल्या बेधडक स्वभावामुळे आणि मैदानावरील तुफानी कमेंट्समुळे कायम चर्चेत असतो. दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून दूर राहिल्यानंतर, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. केवळ बॅटिंग किंवा विकेटकीपिंग नव्हे, तर त्याचे स्टंप माइकवरील तिरकस आणि मजेशीर संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत.
पहिल्या डावात अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना पंतने आपल्या सहकाऱ्यांना सुचना देताना म्हटले, “हे सगळे पुढच्या चेंडूला मागून खेळतात, फील्डर आत ठेवू शकतो. पूर्ण टीमच अशी खेळते.” पंतचे असे कमेंट्स सामन्यात रंगत आणतात आणि क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्या या टिप्पणीने दक्षिण आफ्रिकन फलंदाजीवरची त्याची बारकाईची नजर पुन्हा सिद्ध केली.
यानंतर कुलदीप यादव गोलंदाजीला आला आणि समोर आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमा होता. पंतने येथेही अचूक निरीक्षण करत रवींद्र जडेजाला सांगितले, “जड्डू भाऊ थोडं इथं ठेवा, हा स्वीप मारतो… सिंगलसाठी नाही, कॅचसाठी ठेव.” पंतची भविष्यवाणी क्षणार्धात खरी ठरली. बावुमाने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला आणि ध्रुव जुरेलकडे कॅच देत पॅव्हेलियनकडे परतला. पंतच्या सतर्क मार्गदर्शनामुळे मिळालेल्या या विकेटने भारताची पकड अधिक मजबूत झाली.
आफ्रिकेची पहिल्या डावातील फलंदाजी अत्यंत दयनीय ठरली. संपूर्ण संघ 159 धावांवर गडगडला. एडन मार्क्रमने सर्वाधिक 31 धावा केल्या, तर रियान रिकेल्टनने 23 धावा जोडल्या. वियान मुल्डरने फक्त 24 धावा केल्या. उर्वरित फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे अपयशी ठरले.
भारताकडून जसप्रीत बुमराहने वादळासारखी गोलंदाजी करत पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या अचूकतेसमोर आफ्रिकेचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी दोन-दोन विकेट्स, तर अक्षर पटेलने एक विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळवला.
Comments are closed.