हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याची दुर्दशा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेला माभळे ते पैसाफड हायस्कूल दरम्यानचा रस्त्याची सध्या दूरवस्था झाली आहे. या मार्गावर चालणे म्हणजे सामान्य नागरिक, विद्यार्थी, वयोवृद्ध आणि ग्राहकांसाठी तारवरची कसरत ठरत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असून पाय ठेवण्यासही जागा उरलेली नाही. त्यामुळे हा महामार्ग आहे की भात लावणीचा चिखल? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
विद्यार्थ्यांची अवस्था अजूनच बिकट झाली आहे. शाळेत जायचं म्हणून बाहेर पडलेले विद्यार्थी चिखलाने कपडे खराब झाल्यामुळे परत घरी जात आहेत. परिणामी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकही चिंतेत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, ठेकेदार कंपनीकडून कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. व्यथा मांडायची तरी कुणाकडे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करण्यात याव्यात आणि जनतेच्या सुरळीत प्रवासासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
Comments are closed.