पोलिसांना म्हणाले, शहाणपणा करु नका, आवाज खाली;आता रोहित पवारांविरुद्ध गुन्हा दाखल

रोहित पवार: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा काल (19 जुलै) दाखल करण्यात आला आहे. रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

नेमकं प्रकरण काय?

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यातील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला. विधिमंडळात दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक खटके उडत असतानाच, 17 जुलै रोजी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकारानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनातून अटक केली.

शहाणपण करू नका, हात खाली; रोहित पवार पोलिसांना काय म्हणाले होते?

नितीन देशमुख याच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार रोहित पवार देखील आव्हाडांसोबत उपस्थित होते. आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानंतर रोहित पवारही संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना म्हणाले की, “हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका,” असे रोहित पवारांनी म्हटले होते.

सदर प्रकरणावर रोहित पवार काय म्हणाले?

आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केल्यावर मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्याच्या अनुषंगाने नितीन देशमुख यांच्या भेटीची आम्ही मागणी केली असता पोलिसांनी चार पाच वेगवेगळया पोलीस स्टेशनला 3 ते 4 तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच आव्हाड साहेबांना देखील हातवारे करत अपमानस्पद वागणूक दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पोलीस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलीस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची? राजकीय आदेशाने वागणारे पोलीस लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?, असं रोहित पवार म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=cngu6xz5dny

ही बातमीही वाचा:

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण! रोहित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

आणखी वाचा

Comments are closed.