माझे शरीर पुन्हा सुटेल, मी जाडा होईन…; यशस्वीने दिलेला केक नाकारत रोहितने मजेत दिली प्रतिक्रिया

टीम इंडियाने शनिवारी (6 डिसेंबर 2025) झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव केला. या सामन्यात सलामीला आलेला रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांची बॅट चांगलीच तळपली. दोघांनी मिळून 155 धावांची भक्कम भागीदारी केली आणि संघाचा विजय निश्चित केला. यशस्वीने (116) आपलं वनडे कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं तर रोहितने 75 आणि विराटने 65 धावांची नाबाद खेळी केली. सामन्यासह मालिका जिंकल्यानंतर रोहित आणि यशस्वी यांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने हॉटेलमध्ये केक कापून जल्लोष साजरा केला. टीम इंडियाचे सर्व खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर विराट कोहलीला केक कापण्यास सांगण्यात आले. मात्र, विराटने यशस्वीला केक कापण्याची संधी दिली आणि त्यानेही हसत हसत केक कापला. केक कापल्यानंतर यशस्वीने विराटला केक भरवला. त्यानंतर रोहितला केक भरवण्यासाठी गेला असता. रोहितने मात्र केक खाण्याचे टाळले आणि “मी परत जाड होईन…” असे मजेशीर उत्तर दिले आणि एकच हशा पिकला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.