रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला; ६०० ड्रोन आणि ९० क्षेपणास्त्रे डागली, ४ जणांचा मृत्यू तर ८० जखमी
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आजूबाजूच्या परिसरावर मोठा हल्ला केला आहे. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने एकूण ९० क्षेपणास्त्रे आणि ६०० ड्रोन डागले आहेत. या हल्ल्यात अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या ओरेश्निक या हायपरसोनिक क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला असून ते अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक घरे, शाळा, दुकाने आणि इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काहींना आग लागली आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कीव्ह शहरासाठी ही रात्र अतिशय भयानक होती आणि रात्रभर स्फोटांचे आवाज येत होते, अशी माहिती कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिली. बचाव पथकाकडून आग विझवण्याचे आणि ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने कीव्हपासून सुमारे ६४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिला त्सेरकवा शहरालाही लक्ष्य केले आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत करण्याच्या उद्देशाने रशियाने पाण्याच्या सुविधांवर हल्ले केल्याचा आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे. त्यांनी अमेरिका आणि युरोपीय देशांना रशियावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे रशियाने म्हटले आहे. आम्ही युक्रेनचे लष्करी तळ, एअरबेस आणि लष्कराशी संबंधित केंद्रांना लक्ष्य केल्याचा दावा रशियाने केला आहे. यासाठी ओरेश्निक, इस्कंदर, किंझाल आणि झिरकॉन यांसारख्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे रशियाने म्हटले आहे.
Comments are closed.